ाश्वत विकासासाठी जलसंवर्धनाची लोकचळवळ

विशेष लेख शाश्वत विकासासाठी जलसंवर्धनाची लोकचळवळ महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्याबाबत जनमानसात जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने यंदा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सेक्युअर टुमारो' अर्थात माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा ही या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जलसंधारणाच्या या कार्याला सर्वसमावेशक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या बदलत्या हवामानामुळे अनियमित पर्जन्यमान आणि भूजल पातळीतील घट यांमुळे जलसुरक्षेचे आव्हान गंभीर बनले आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यासारख्या भागातील सरासरी पर्जन्यमानाची अनिश्चितता आणि सध्या जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांमध्ये असलेला अल्प पाणीसाठा विचारात घेता, उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि भूजल पातळी वाढवणे अत्यंत गरजेचे बनले आहे. लातूर जिल्ह्यातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट रोजी आयोजित ‘महा वॉकेथॉन’मधील नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, महिला, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाचा संकल्प अधिक दृढ करणे आवश्यक आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी कमाल तीन किलोमीटर अंतराची 'महा वॉकेथॉन' आयोजित केली जाईल. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व सहभागी नागरिकांकडून मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. या राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे होणार असून जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे. महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड आधारित ऑनलाईन नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई-प्रमाणपत्र आणि जिल्हास्तरावरील प्रथम १० विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जलसंधारण सप्ताहाचे औचित्य साधून १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी राज्यव्यापी ‘Reel for Soil and Water Conservation’ या डिजिटल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे, वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांवर ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करून ती #SaveSoilSaveWater या हॅशटॅगसह अपलोड करायची आहे. या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह असे पुरस्कार दिले जाणार असून विजेत्यांना 'युवा मृद-जलदूत' म्हणून सन्मानित केले जाईल. याशिवाय, २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जलसंधारणाची शपथ घेणे असे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा, महाविद्यालये व विद्यार्थ्यांना २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल. लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला जलसमृद्ध आणि सुरक्षित बनवण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन 'माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा' या संदेशास कृतीची जोड देण्याची गरज आहे. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, लातूर ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास