लातूर शहरातील पाणी पुरवठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार
लातूर शहरातील पाणी पुरवठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार
• पाण्याच्या काटकसरीने वापरासाठी जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना
लातूर, दि. २२ : शहरातील पाणी पुरवठ्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेले वेळापत्रक आणि पाण्याच्या वापराबाबतच्या नियोजनाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज आढावा घेतला. तसेच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीला लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, अविनाश कोरडे, लातूर शहर महानगरपालिका उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, तहसीलदार वर्षा मनाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह जलसंपदा विभाग, महावितरणचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. धाराशिव, बीड जिल्ह्यातील अधिकारीही या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
लातूर शहर महानगरपालिकेने प्रत्येक नळाला तोटी बसवून घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. त्यानुसार तोटी न बसविणाऱ्या नागरिकांनावर दंडात्मक कार्यवाही सुरु करावी. तसेच महानगरपालिका जलवाहिनीला बाधा पोचविणाऱ्या किंवा त्याचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्यासोबतच त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले. शहरातील वॉशिंग सेंटरकडून वाहन धुण्यासाठी महानगरपालिकेचा वापर होत असल्यास त्यांच्या नळजोडणी तातडीने तोडाव्यात. तसेच अशा सेंटरमध्ये पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी शहरातील पाणी वितरणाचे नियोजन आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनीही पाणी पुरवठा अनुषंगाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
*****


Comments
Post a Comment