लातूर जिल्ह्यात रविवारी ‘उल्लास नव भारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

लातूर जिल्ह्यात रविवारी ‘उल्लास नव भारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी लातूर, दि. २२ (जिमाका): केंद्रशासन पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी येत्या रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी लातूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. लातूर जिल्ह्यासाठी या शैक्षणिक वर्षात ३४ हजार ४७२ असाक्षरांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १९ हजार ८६१ असाक्षरांची नोंदणी पूर्ण झाली आहे. नोंदणी केलेल्या संबंधित शाळेतच ही परीक्षा होणार असून, यामध्ये मराठी माध्यमाचे २० हजार १२९ व उर्दू माध्यमाचे ४८२ असे एकूण २० हजार ६११ असाक्षर सहभागी होणार आहेत. परीक्षेस उपस्थित राहण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे शिक्षण संचालक आणि लातूरच्या शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडून करण्यात आले आहे. परीक्षा रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी ३ तासांचा असेल (दिव्यांग व्यक्तींसाठी ६० मिनिटे जादा वेळ राहील). परीक्षार्थी या कालावधीत कधीही येऊन परीक्षा देऊ शकतील. चाचणी ऑफलाइन पद्धतीने होईल, ज्यामध्ये परीक्षार्थीस प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असणारी हार्ड कॉपी दिली जाईल. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा बॉलपेन वापरणे बंधनकारक आहे. पेन्सिल किंवा इतर रंगाची शाई चालणार नाही. परीक्षेस जाताना नोंदणी फॉर्मवर डकवण्यासाठी स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो आणावा (फोटोबाबत सक्ती करू नये). तसेच जन्मतारखेचा व ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वतःचे मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यासंबंधीच्या तीन भागांत विभागलेली असून एकूण ५० गुण असतील. चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (म्हणजेच १६.५ गुण) आणि एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (४९.५ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी जास्तीत जास्त ५ वाढीव (ग्रेस) गुण देता येतील, परंतु तिन्ही भागांचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत. यु-डायस क्रमांकानुसार नोंदणी केलेली प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असेल. उल्लास अॅपवर नोंदणीकृत व्यक्तीच चाचणीस पात्र असेल; मात्र ज्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नसेल, त्यांना चाचणीच्या दिवशी मौकेवर नोंदणी करून चाचणी देता येईल. या मूल्यमापन चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करून विहित निकषांनुसार उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक प्रदान केले जाईल. या उपक्रमामुळे व्यक्तींच्या जीवनात आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन, शिक्षण आणि कुटुंब कल्याण ही जीवनकौशल्ये विकसित होण्यास व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. तरी नोंदणी केलेल्या सर्व असाक्षर व्यक्तींनी रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत स्वतःच्या ओळखपत्रासह निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर न विसरता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत