आमदार सतिश चव्हाण यांच्या हस्ते स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा व वैद्यकीय साहित्याचे वितरण आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते संपन्न, आरोग्य सेवा सुसज्ज असणे ही काळाची गरज - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

 

*आमदार सतिश चव्हाण यांच्या हस्ते स्थानिक

विकास निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण,*

 

§  ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा व वैद्यकीय साहित्याचे वितरण आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते संपन्न

 

§  आरोग्य सेवा सुसज्ज असणे ही काळाची गरज - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

 



लातूर,दि.18 (जिमाका) :-
आरोग्य सेवा सुसज्ज असणे ही काळाची गरज आहे. भविष्यात येणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा आपण सर्वांनी अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच या ऑक्सिजन प्लांटमुळे या रुग्णालयात रुग्णांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मुरुड येथेच ऑक्सिजनची सेवा उपलब्ध झालेली आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी मुरुड येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, रुग्णवाहिकेचे लोकार्पण व साहित्याचे वितरण कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. 

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या स्थानिक निधीतून वैद्यकीय साहित्य व मुरुड ग्रामीण रुग्णालय येथील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण तसेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिकेचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते मुरुड येथील ग्रामीण रुग्णालय येथे संपन्न झाला. 

याप्रसंगी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप नाडे, मुरुडचे सरपंच अभयसिंह नाडे, जिल्हा नियाजन समितीचे सदस्य विजय देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील तसेच मुरुड येथील ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.
 

            लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख म्हणाले की, येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअरच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठीही प्रयत्न तसेच त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे यात मुरुड येथील लोकप्रनिधींनी प्रभागनिहाय आरोग्य विभागाला पूर्णपणे सहकार्य करावे, आपल्या गावाचे कोरानापासून बचावासाठी लसीकरण करुन घेणे ही मोहिम गावपातळीवर राबविण्यात यावी. यावेळी पुढे बोलतांना आमदार धीरज देशमुख म्हणाले की, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी कोरोनाच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दलही कौतूक केले. शासन आपल्या आरोग्याची संपूर्णपणे काळजी घेण्यासाठी सर्वोत्परीने प्रयत्न करणार आहे.  

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे सतीश चव्हाण म्हणाले की, कोरोना काळात या रुग्णालयात कमी क्षमता असताना या मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे उत्कृष्ट सेवा दिली आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

 

मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे म्हणाले की, कोरोनापासून आपल्या स्वत:चा बचाव करावयाचा असेल तर मास्क वापरणे हे अत्यंत महत्वाचे असून आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे. शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय व नवी इमारत तयार करण्यासाठी आम्ही सर्व व्यासपीठावरील आमदार प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही ही श्री. काळे यांनी दिली. 

मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून योग्य उपचार करण्यात यावेत. तसेच गरीबांची सेवा करण्यासही प्राधान्य द्यावे, असेही त्यानी यावेळी सांगितले. 

जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप दादा नाडे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, या ऑक्सिजन प्लांटमुळे ऑक्सिजनसाठी इतर रुग्णालयात जाण्याची गरज मुरुडच्या नागरिकांना लागणार नाही असेही श्री. नाडे म्हणाले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक  डॉ. सुनिता पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. वसीम सय्यद यांनी केले.

                    

                                                               0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु