अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आढावा
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा
पालकमंत्री ना. अमित विलासराव
देशमुख यांच्याकडून आढावा
§ युध्द पातळीवर मदत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित
§ नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन
लातूर,दि.२८ (जिमाका) लातूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी
आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री अमित विलासराव
देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाकडून आढावा घेतला असून मदत कार्यासाठी
युद्धपातळीवर यंत्रणा सज्ज करून कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती नियंत्रण
कक्ष स्थापन करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत,
अतिवृष्टीचे सावट दूर होईपर्यंत नागरिकांनीही घराबाहेर पडू नये सुरक्षितस्थळी थांबावे
असे आवाहन केले आहे.
मागच्या दोन दिवसात झालेली अतिवृष्टी, धरणातून सोडलेले
पाणी यामुळे नदीकाठी निर्माण झालेली पूर परिस्थिती
या पार्श्वतभूमीवर नदीकाठची गावे, वस्त्या तसेच पाण्याने वेढलेल्या सखल भागातील अडकलेल्या
नागरिकांनाही मदत पथकाद्वारे बाहेर काढण्याच्या सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत.
आपदग्रस्थासाठी तात्पुरते निवारे
उभारावेत
नदीकाठी किंवा सखल भागात पाण्याचा धोका निर्माण झालेल्या
ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा स्थलांतरित
नागरिकांसाठी आवश्यकते नुसार अन्न, पाणी, निवारा या व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हा
प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनास दिले आहेत.
राष्ट्रीय आपत्तीनिवारण पथकासाठी
मागणी नोंदवावी
हवामान विभागाने आणखी एक दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज
व्यक्त केला आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार राष्ट्रीय आपत्तीनिवारण विभागाची पथकासाठी
मागणी नोंदवून ठेवावी जेणे करून अशी पथके वेळेत दाखल होवु शकतील अशी सुचनाही पालकमंत्री
देशमुख यांनी केली आहे.
अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी
थांबूनपरिस्थितीवर लक्ष ठेवावे
जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,
तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात
थांबून परिस्थितीवर लक्ष ठेऊन रहावे आवश्यकतेनुसार ग्रामस्थ, शेतकरी, नागरिक यांना
मदत करावी अशा सुचनाही त्यांना केल्या आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे, शेती
अवजारे सुरक्षीत स्थळी घेऊन जावेत यासाठी त्यांना
सुचना द्याव्यात. त्यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.
क्षणा क्षणाची माहिती आणि मदत
कार्यावर लक्ष
मांजरा तसेच इतर धरणांचे दरवाजे उघडले असल्यामुळे
नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. अनेक ठिकाणी शेतकरी अडकून पडल्याच्या माहिती येत
आहे त्यांना वेळेत मदत पाहोचवण्यासाठी सुचना देण्यात येत आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी
मदत पथके पाठवण्यात येत आहेत येत आहे अशी माहिती पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी दिली आहे.
परिस्थिती आटोक्यात येताच सर्व
प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करावेत
पावसाचे आणि पुराचे पाणी वातावरण निवळुन परिस्थिती
आटोक्यात येताच सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. आपदग्रस्थांना राज्यातील
महाविकास आघाडीचे सरकार सर्वोतोपरी मदत करणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नये. नागरिकांनी
सुरंक्षित स्थळी जाण्यास प्राधान्य दयावे असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले
आहे.
00000
Comments
Post a Comment