मांजरा नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहावे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे आवाहन

 

मांजरा नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहावे

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे आवाहन

 

लातूर,दि.23 (जिमाका):- मांजरा प्रकल्पात सातत्याने पाण्याची आवक सुरु असल्याने हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे.पूर नियंत्रण करण्यासाठी धरणातील अतिरिक्त पाणी मांजरा नदी व्दारे तसेच कालव्यातून ठरवलेल्या नियमाप्रमाणे सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मांजरा नदीवरील बॅरेजेस देखील पूर्णपणे भरले असून धरणातून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडल्यास तसेच येणारा पाण्याचे आवक वाढत राहिल्यास  पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मांजरा नदी वरील सर्व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

पुढील दोन-तीन दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता असल्याने व जिल्हयातील काही मध्यम प्रकल्प / बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत व काही मध्यम प्रकल्प भरण्याची शक्यता निर्माण झाली असून परिस्थितीनुरुप केंव्हाही प्रकल्पातील पाणी विसर्ग करावे लागणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे.त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क रहावे.संभाव्य पूरपरिस्थिती व विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी पूढील प्रमाणे काळजी घ्यावी.

मुसळधार पाऊस सुरु असताना शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे, कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात जाऊ नये. जिल्हयातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने कोणीही, जलसाठे पाण्यासाठी / पर्यटनासाठी जाऊ नये. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे.नदीपात्राजवळ घरे असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, आपल्या गरजेच्या वस्तू (उदा.औषधी, रोख रक्कम) स्वत: जवळ बाळगावे.नदीपात्राजवळ आपली मुकी जनावरे बांधू नयेत. मुकी जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकानातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

या कालावधीत विजा पडण्याची शकयता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी / नागरिक  यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 03 ते 07 या  वेळेत शेतीची व इतर कामे करु नये कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली / पाण्याच्या स्त्रोताजवळ / विदयुत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा.

जलसाठयाजवळ / नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठयावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये,शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन / नाल्यावरुन पाणी वाहत असताना कोणीही स्वत:किंवा वाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. पाऊस सुरु असताना विजेच्या तारा / जुनया इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.स्थानिक पोलीस अधिकारी / तलाठी / मंडळ अधिकारी / ग्रामसेवक / सरपंच / कृषि सहाय्यक / (शहरी भागात मनपा / न.प. योंचे अधिकारी) यांचेशी संपर्कात राहून ते देत असलेल्या सूचनांचे पालन करावे. आपल्या आप्तेष्टांना तसेच गावकऱ्यांना सावधगीरीची सूचना देवून योग्य ती उपायोजना करावी.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा