एम.आय.डी.सी.त येणाऱ्या कामगारांच्या चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्यावी, जिल्हा प्रशासनाकडून सुचना

 

एम.आय.डी.सी.त येणाऱ्या कामगारांच्या चारित्र्य पडताळणीसाठी

ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्यावी, जिल्हा प्रशासनाकडून सुचना

 

§  एम.आय.डी.सी.तील रस्ते, गटारे दुरुस्ती करावेत

§  प्रस्तावित एम.आय.डी.सी.चे प्रस्ताव मुख्यालयास पाठवावेत

 



लातूर,दि.20,(जिमाका):-
विविध राज्यातून लातूर येथे विविध कारखान्यात येणाऱ्या कामगारांची चारित्र्य पडताळणी एमआयडीसीने गुगल स्प्रेडशिटद्वारे करावी. जेणेकरुन डाटा उपलब्ध ऑनलाईन करुन घेता येईल, असे जिल्हा प्रशसाकडून एम.आय.डी.सी. कार्यालयास सांगण्यात आले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समिती, आजारी उद्योग पुनर्वसन समिती व स्थानिक लोकांना रोजगार प्राधान्य समिती सभा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  ही बैठक दर तीन महिन्यांनी होत असते.  

या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी आरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी म. रो. दुशिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उप विभागाचे के. एम. चाटे, क्षेत्र अधिकारी आर. जी. क्षीरसागर, लघु उद्योजक भारतीचे प्रवीण सगर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थपाक पी.डी. हनबर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे तसेच औद्यागिक संघटना तसेच संबंधित विविध खाते प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

            एमआयडीसीतील रस्त्यांची दुरुस्ती एका महिन्याच्या आत करुन घ्यावी व दुरुस्ती केलेल्या रस्त्यांचा अहवाल छायाचित्रासह सादर करावा, अशा सुचना लातूर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता  यांना सुचना दिल्या.  तसेच विद्युत रोहित्र (डि.पी.) च्या आजूबाजूस असलेला कचरा व त्याची दुरुस्ती करावी. विद्युत ताराला वृक्षांच्या फांद्यामुळे येणाऱा अडथळा होत असेल तर त्याबाबतचेही नियोजन करावे. पथदिवे ( स्ट्रीटलाईट) च्या दुरुस्तीचेही कामकाज तात्काळ पूर्ण करावेत. एमआयडीसीअंतर्गत गटारींचे एका महिन्याच्या आत सर्व्हे करुन गटारींचीही दुरुस्ती करण्यात यावी व तसा अहवालही सादर करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी बैठकीदरम्यान सुचना केल्या.

तसेच नवीन प्रस्तावित लातूर, चाकूर, उदगीर येथील एम.आय.डी.सी. साठीच्या प्रस्तावासाठी प्रस्तावासाठी एमआयडीसीने मुख्यालयाकडे पाठपुरावा करावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी सुचना केल्या.

एमआयडीसीमधील कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ जिल्हा कौशल्य विकास या विभागाकडून मनुष्यबळाला त्याचे प्रशिक्षण देवून मनुष्यबळ कारखान्यांना उपलब्ध करुन द्यावेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा कौशल्य विकास विभागाचे  सहाय्यक आयुक्त बालीजी मरे यांना केल्या.

            राज्यभरातील तसेच इतर बाहेर राज्यातील रोजगारासाठी लातूर येथील एमआयडीसीमध्ये येत असतात. बाहेरुन येणाऱ्या कामगारांचे चारित्र्य पडताळणी करण्यासाठी कारखानदारांनी गुगल स्प्रेडशिट तयार करुन कामगारांचा त्यांच्या आधारकार्डासह इतर आवश्यक सर्व तपशिल (डाटा) एमआयडीसीने पोलीस विभागाला पाठविण्यात यावे. एमआयडीसीतील कारखान्यात होणाऱ्या चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठीही कारखानदारांनी स्वत:हून पुढाकार घेवून आपआपल्या भागत सीसीटीव्ही बसवावेत अशी  सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बैठकीत सुचना केली.

जिल्ह्यात उद्योगाचे उत्तम काम करणाऱ्या आस्थापना, नाविण्यपूर्ण उत्पादन यांचे अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी विविध प्रसार माध्यमांचा उपयोग व्हावा, त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय काम करेल, असे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले.

निर्यातदारांसाठी येत्या 24 सप्टेंबरला

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

जिल्ह्यातील निर्यादार उद्योग घटक, जे निर्यात करु इच्छिणारे उद्योजक, शेतकरी, बचत गटांची कार्यशाळा येत्या 24 सप्टेंबर, 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिपीडीसी हॉल येथे आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निर्यातदारांनी निर्यात कशी करावी याबाबतची सविस्तर माहिती  निर्यातदारांना या कार्यशाळेत आपल्या उद्योगातील उत्पादित उत्पादन ठेवण्यात येणार आहे. तसेच याबाबतचेही मार्गदर्शन या आयोजित कार्यशाळेत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात निर्यात वाढली पाहिजे. उत्पादकांना फायदा कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न असणार आहे. यासाठी जास्तीत - जास्त निर्यातदार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

या कार्यशाळेत जिल्हा निर्यात आराखडा याबाबतही सविस्तर चर्चा केली जाणार आहे. यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचाही सहभाग असणार आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हनबर यांनी बैठकीत सांगितले.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा