कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या कालावधीत अंगणवाडी सेविकांचे केलेले कार्य गौरवास्पद - राज्यमंत्री संजय बनसोडे

 

 

महिला व बालविकास विभागाच्यावतीने आयोजित पोषण अभियानातर्गंत अंगणवाडी सेविका, मदतनीस महिला मेळावा व गौरव सोहळा

 

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या कालावधीत

अंगणवाडी सेविकांचे केलेले कार्य गौरवास्पद

- राज्यमंत्री संजय बनसोडे


जिल्ह्यातील 2 हजार 408 पैकी 850 अंगणवाड्या डिजिटल

 

ग्रामपातळीवर कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गौरव

 


लातूर,दि.26(जिमाका):-ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना अंगणवाडी सेविकांची जबाबदारी अधिक वाढली होती. त्या कालावधीत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी कोरोना सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून अंगणवाडी सेविकांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे, असे राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रतिपादन केले.

   


महिला व बालविकास विभागाच्यावतीने आयोजित अंगणवाडी सेविका, मदतनीस महिला मेळावा व गौरव सोहळा, पोषण आहार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

कौळखेड रोड उदगीर येथील शिवम फंक्शन हॉल येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित महिला व बालविकास विभागाच्यावतीने आयोजित पोषण अभियानातर्गंत अंगणवाडी सेविका, मदतनीस महिला मेळावा व गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

 


या कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंके, उदगीर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, जिल्हा परिषद सभापती गोविंदराव चिलकुरे, सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा परिषद सदस्या विजयाताई बिराजदार,पंचायत समिती सदस्य रामदास बेमडे, रणजीत कांबळे,विजयकुमार पाटील, सुभाष कांबळे,तहसीलदार रामेश्वर गाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, गटविकास अधिकारी शाम गोडभरले,पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री.लोहकरे,रामदास एैनिले आदि संबंधित विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलाने सुरुवात करण्यात आली.


राज्यमंत्री संजय बनसोडे कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महिलांचे काही प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत,त्याचा पाठपुरावा करुन ते मार्गी लावण्यात येतील. तसेच अतिशय कमी वेतनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका या ग्रामीण भागात करत असतात. लहान मुलांवर संस्कार करणं कठीण काम असतं ते काम त्या जबाबदारीने बजावत असतात तसेच दवाखान्यातील नर्सेस यांनीही कोविडच्या काळात अत्यंत महत्वाची सेवा दिली आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानस्पद बाब आहे, असेही राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले.

      जिल्ह्यातील 2 हजार 408 पैकी 850 अंगणवाड्या डिजीटल करण्यात आलेल्या आहेत,  त्या भौतिक सुविधा सुसज्ज आहेत. तसेच गरोदर मातांना पोषण अभियानातर्गंत तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या अन्य योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या  राबविण्यात येत आहेत, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी सांगितले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे खुली करुन दिली आहेत. अंगणवाडी सेविका या पिढी घडविण्याचे कार्य करीत असतात. कोरोनाच्या कालावधीत अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांनी स्वत:ची जबाबदारी अतिशय चोख पध्दतीने सांभाळली आहे. त्यामुळे जिल्हयातील अंगणवाड्या शाळा चांगल्या व भौतिक सुविधेने परिपूर्ण झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योतीताई राठोड यांनी व्यक्त केली.

समाज कल्याण सभापती रोहीदास वाघमारे यांनीही जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या अंमलबजावणी उत्तम प्रकारे राबवित असल्याचेही यावेळी सांगितले.

कोविडच्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांनी केलेल्या मेहनतीला सलाम केला. पोषण अभियानातर्गंत मुलांना योग्य आहार मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका सातत्याने सेवा बजावतात.आरोग्य उत्तम राहण्यासाठी व आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फळे, कडधान्य सेवन करणे आवश्यक आहे. असेही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सौ.भारतबाई साळूंखे यांनी असे प्रतिपादन व्यक्त केले.

अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांनी कोविडच्या काळात सर्वसामान्यपर्यंत सेवा पुरविली. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद तर आहेच एक चांगला आपल्या समोर आदर्शही निर्माण केला आहे. ज्याप्रमाणे देशाचं सैनिक भारताचे संरक्षण करीत असतात. त्याचप्रमाणे कोरोनाच्या कालावधीत कोरोनाविरुध्दची लढाई त्याच पध्दतीने अंगणवाडी सेविकेने बजावली आहे, असे पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे यांनी सांगितले.

महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषदेच्यावतीने कोविड-19 च्या काळात ग्रामपातळीवर कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसुरकर यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रम, नवजात मुलीचे व आई-वडिलांचे व पोषण आहार योजनेतंर्गत चिमुकल्याला घास भरवून स्वागत करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बापूसाहेब राठोड यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानोबा मुंढे व धनंजय गुडसुरकर यांनी केले. तर गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी आभार मानले. 

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा