*पालकमंत्री नामदार अमित विलासराव देशमुख तातडीने लातूरमध्ये दाखल* *अतिवृष्टी व पूर परिस्थिती संदर्भात घेतला आढावा* *युध्दपातळीवर मदत कार्य राबविण्याचे निर्देश*

 

*पालकमंत्री नामदार अमित विलासराव देशमुख तातडीने लातूरमध्ये दाखल*

*अतिवृष्टी व पूर परिस्थिती संदर्भात घेतला आढावा*

*युध्दपातळीवर मदत कार्य राबविण्याचे निर्देश*

 


लातूर दि.28 (जि. मा. का ): लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीचा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी येथील विमानतळावर जिल्हा प्रशासन, पोलिस, कृषी, पाटबंधारे यासह विविध विभागाचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. आपादग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी युध्दपातळीवर यंत्रणा राबविण्याचे निर्देश यावेळी दिले. 


मागच्या दोन दिवसात लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पुर परिस्थीती उद्भवल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे मंगळवारी दुपारी तातडीने लातूर येथे दाखल झाले. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जगताप, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री एम.एम.पाटील, श्री रोहन जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, उपविभागीय अधिकारी श्री सुनिल यादव, तहसिलदार श्री स्वप्नील पवार व इतर अधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील एकुण स्थितीची माहिती करुन घेतली. या बैठकीस स्थायी समितीचे सदस्य श्रीशैल् उटगे, ॲड किरण जाधव, ॲड समद पटेल, श्री विजय देशमुख, श्री चंद्रकांत मद्ये, अभय साळुंके, ॲड दिपक सुळ, श्री सुभाष घोडके, श्री इम्रान सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

*काळजी करु नका, धीर धरा….आपणाला सुरक्षित घेऊन येण्यासाठी पथक येत आहे*

 


एकुण परिस्थीतीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर तालुक्यातील टाकळी, सारसा तसेच रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, डिघोळ देशमुख येथील शेतवस्तीवर पुराच्या पाण्यामुळे अडकुन पडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणा राबविण्याचे निर्देश दिले. या वेळी त्यांनी पोहरेगाव येथील श्री नागोराव तर टाकळी येथील श्री भागवत ऊफाडे, श्री बाबुराव बिराजदार या शेतकऱ्यांशी विजय देशमुख यांच्या मोबाईलवरुन संपर्क साधला.आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आपल्याला घेऊन जाण्यासाठी येत आहे असे सांगुन काळजी करु नका, धीर धरा आम्ही आपल्या मदतीसाठी आहोत, अशा शब्दात त्यांना धीर दिला. 

 

पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी उदगीर, निलंगा, शिरुर अनंतपाळ, चाकूर, अहमदपूर, औसा, जळकोट, देवणी या तालुक्यातील परिस्थिचीही  यावेळी माहिती करुन घेतली. लेंडी, माकणी, मसलगा धरणातील पाण्याची स्थिती व त्या भागात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली. लातूर शहरातील खाडगाव, कन्हेरी नाका व इतर काही वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याबाबत आलेल्या तक्रारी संदर्भात महानगरपालिका आयुक्त श्री मित्तल यांच्याकडे चौकशी केली. निलंगा तालुक्यातील हालसी, तगरखेडा या भागात उद्भवलेल्या पूर परिस्थितीची माहिती घेऊन तेथील ग्रामस्थांना दिलास देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

 

*राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाबरोबर चर्चा*

जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमेवत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर लातूर विमानतळावर हेलीकॉप्टरसह दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या पथकासोबत पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी चर्चा केली. पथक लातूर आत पोहोचले तेव्हा अंधार पडू लागला होता त्यामुळे हे पथक या ठिकाणीच मुक्कामी राहणार आहे. बुधवारी सकाळी आवश्यकतेप्रमाणे पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी मदत कार्य सुरु करण्याचे सुचना या पथकाला दिल्या. उस्मानाबाद जिल्ह्यात या पथकाने केलेल्या मदत कार्याबद्यल कौतूक करुन त्यांचे आभारही ना.देशमुख यांनी यावेळी मानले.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा