पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; लातूर जिल्ह्यातील ८,७३९ शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६;
लातूर जिल्ह्यातील ८,७३९ शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध
लातूर, दि. ११ : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील एकूण ८१२ गावांमधील ८,७३९ शेतकरी सभासदांचा विशिष्ट क्रमांकासह समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २,०२८ सभासद असून उर्वरित ६,७११ सभासद राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे आहेत. ही यादी प्रमाणीकरणासाठी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या योजनेद्वारे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरीत झालेल्या, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित/फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात असून, यासाठी शासनाने महाआयटी यांची नियुक्ती केली आहे. महाआयटीच्या योजना पोर्टलवर बँकांनी एकूण ८६,४१४ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली होती, ज्यापैकी संगणकीय संस्करणानंतर ५४,३८८ पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची ग्राह्य धरण्यात आली असून, १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांच्या बाबतीत काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी २ लाखांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या 'हेअर कट' धोरणानुसार ही सर्व कर्जे निरंक करण्यात येणार आहेत. तसेच, योजनेअंतर्गत मृत झालेल्या, वयस्कर किंवा बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानके कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या थकबाकीची खातरजमा करून तात्काळ नजीकच्या 'आपले सरकार' सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रमाणीकरणासाठी जाताना शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक, यादीत नावापुढे नमूद असलेला विशिष्ट क्रमांक सोबत ठेवावा; तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही यादी गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, बँक शाखा, सहाय्यक निबंधक कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध आहे. बँकेचे कर्मचारी, सहाय्यक निबंधक आणि गटसचिवांना प्रमाणीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरी सर्व पात्र कर्जदार शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी केले आहे.
***
Comments
Post a Comment