लातूरकरांसाठी खरेदीची पर्वणी ! 12 व 13 सप्टेंबरला ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाचे आयोजन
लातूरकरांसाठी खरेदीची पर्वणी !
12 व 13 सप्टेंबरला ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाचे आयोजन
लातूर, दि. 9 (जिमाका) : स्थानिक उद्योजक व उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्यावतीने लातूर येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 व 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत विवेकानंद संस्कार संस्था सभागृह, लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटातील उत्पादक, विक्रेते आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन व थेट विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या प्रदर्शनात कपडे, घरगुती खाद्यपदार्थ, कलात्मक वस्तू, ज्वेलरी, विविध हस्तकला व स्वदेशी उत्पादनांचे स्टॉल नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारची उत्पादने एकाच ठिकाणी पाहण्यास व थेट खरेदी करण्याची संधी लातूरकरांना मिळणार आहे.
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादनांची थेट उपलब्धता या त्रिसूत्रीवर ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाची संकल्पना आधारित आहे. या माध्यमातून लघुउद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तसेच नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची संधी मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून लातूरकरांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी व त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ‘अमृत’च्या वतीने करण्यात आले आहे.
******
Comments
Post a Comment