जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचा मराठा आरक्षणविषयक प्रतिनिधींशी संवाद

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचा मराठा आरक्षणविषयक प्रतिनिधींशी संवाद • कुणबी जात प्रमाणपत्र वाटपासाठी आयोजित शिबिरांबाबत दिली माहिती लातूर, दि. १० : जिल्ह्यात जात प्रमाण पत्राच्या वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने आजपासून १७ सप्टेंबरपर्यंत महसूल मंडळस्तरीय शिबिरे आयोजित केली आहेत. या अनुषंगाने माहिती देण्यासाठी, तसेच कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याकरिता येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील मराठा आरक्षणविषयक आंदोलनकर्ते, प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला. जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुलभता आणि गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींकडून माहिती, सूचना जाणून घेतल्या. कुणबी नोंदी आढळलेल्या पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता यावा, यासाठी मंडळ स्तरावर १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व वंशावळीचे पुरावे याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी ग्रामपंचायती आणि जिल्ह्यांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही नोंदी नागरिकांकडे उपलब्ध असतील तर त्याबाबतची माहिती सादर करावी. जात प्रमाणपत्राबाबत अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे, वंशावळीचे पुरावे आणि अर्ज करण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व तहसीलदारांना केल्या. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनीही आपल्या सूचना आणि अभिप्राय यावेळी मांडले. कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या अनुषंगाने नियुक्त जिल्हास्तरीय नोडल अधिकारी अहिल्या गाठाळ यांची यावेळी उपस्थिती होती. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत