लातूर जिल्ह्यात ४३ गावात झळकल्या कुणबी नोंदी; १० ते १७ सप्टेंबर दरम्यान विशेष कुणबी जात प्रमाणपत्र वाटप शिबिरे

लातूर जिल्ह्यात ४३ गावात झळकल्या कुणबी नोंदी; १० ते १७ सप्टेंबर दरम्यान विशेष कुणबी जात प्रमाणपत्र वाटप शिबिरे लातूर, दि. ०९ : जिल्ह्यात कुणबी नोंदींचा शोध घेणे, प्रमाणपत्रे वितरित करणे, वंशावळी जुळवणे आणि मराठा आरक्षणाशी संबंधित प्रशासकीय कामकाज गतीने पार पाडले जात आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २९ लाख ४३ हजार ६९० नोंदींची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान ४३ गावांमध्ये एकूण १,०३२ कुणबी नोंदी आढळून आल्या असून या सर्व नोंदी नागरिकांच्या माहितीसाठी संबंधित ४३ ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केल्या आहेत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही अपलोड करण्यात आल्या असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. *कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाची अद्ययावत स्थिती* शोधलेल्या नोंदींच्या आधारे आणि नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाकडे एकूण २ हजार ९२४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ८७० अर्जांची छाननी पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली आहेत व ४७ अर्ज नाकारले असून सद्यःस्थिती केवळ ०७ अर्ज प्रक्रियेत आहेत. याशिवाय, हैद्राबाद गॅझेटिअरच्या आधारे कुणबी जातीचे दाखले देण्याबाबत ०२ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार प्राप्त ४० अर्जांपैकी २५ अर्ज मान्य करण्यात आले असून ०७ अर्जांवर कार्यवाही सुरु आहे. तसेच ०२ सप्टेंबर २०२५ नंतर सर्वसमावेशक (एकत्रित) कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी प्राप्त झालेल्या ४६० अर्जांपैकी तब्बल ४४६ अर्ज मान्य करून वितरीत करण्यात आले आहेत. *१५० जात पडताळणी प्रमाणपपत्रे आणि ४५ हजार एसईबीसी प्रमाणपत्रांचे वितरण* जात पडताळणी समितीकडे आजपर्यंत वैधतेसाठी एकूण २७८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १५० अर्जांना वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे, तर २० अर्ज इतर तांत्रिक कारणास्तव निकाली काढण्यात आले असून उर्वरित १०८ अर्ज पडताळणीच्या प्रक्रियेत आहेत. दुसरीकडे, एसईबीसी १० टक्के आरक्षणानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारीनुसार लातूर तालुक्यात ८ हजार ९६३, औसा-रेणापूर १० हजार १६३, निलंगा १२ हजार ५५३, अहमदपूर ८ हजार ८४२ आणि उदगीर तालुक्यात ४ हजार ४९७ अशा प्रकारे जिल्हाभरात एकूण ४५ हजार ०१८ प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. *आंदोलनातील गुन्हे मागे घेणे व वारसांना मदत* मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर दाखल असलेल्या ४४ गुन्ह्यांपैकी सर्व ४४ गुन्हे मागे घेण्याबाबत समितीने न्यायालयाकडे शिफारस केली होती. या शिफारशीनुसार मा. न्यायालयातून ३९ गुन्हे पूर्णपणे मागे घेण्यात आले आहेत, तर उर्वरित ०५ गुन्ह्यांची मागे घेण्याची प्रक्रिया सुरुत आहे. *गावपातळीवरील समित्या व वंशावळ प्रक्रिया* कुणबी प्रमाणपत्र तातडीने व विनासायास मिळण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्तरीय यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. जिल्ह्यातील ९४९ गावांपैकी लातूर (१२४), औसा-रेणापूर (२०७), अहमदपूर (२०८), निलंगा (२६४) आणि उदगीर (१४६) या सर्व ९४८ गावांमध्ये ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत; केवळ लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील १ समिती गठीत होणे प्रलंबित आहे. या समित्यांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात ९ प्रशिक्षण सत्रे आयोजित करून ९७० सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे समिती सदस्य प्रत्यक्ष गृहभेटी देऊन चौकशी अहवाल सादर करत आहेत. वंशावळ जुळवण्यासाठी गठीत तालुकानिहाय समित्यांना ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून प्राप्त २९८ अर्जांपैकी २९६ प्रकरणांमध्ये वंशावळी यशस्वीपणे जुळवण्यात आली आहे. तसेच जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र बाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्याशसाठी जिल्हालस्त रावर नायब तहसीलदार यांची नियुक्तीर करण्याेत आली असून ०२३८२-२२०२०० हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्या‍त आला आहेत. *१० ते १७ सप्टेंबर दरम्यान मंडळनिहाय कुणबी प्रमाणपत्र वाटप शिबीर* नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिल्या गाठाळ यांची या संपूर्ण जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रक्रियेत नागरिकांच्या अडीअडचणींचे निरसन करण्यासाठी, तसेच प्रक्रिया पारदर्शक व गतिमान करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ०३ सप्टेंबर २०२६ च्या पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश देऊन येत्या १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मंडळ निहाय विशेष शिबिरांचे आयोजन करून पात्र नागरिकांना तत्परतेने कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत