मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात विशेष शिबीरांचे आयोजन • १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर आयोजन

मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात विशेष शिबीरांचे आयोजन • १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर आयोजन लातूर, दि. १० (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ ते ३० सप्टेंबर, २०२६ या कालावधीत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची, विशेषतः नवमतदार, महिला व दिव्यांग नागरिकांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण व्हावी, यासाठी लातूर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विशेष नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर, २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विशेष नोंदणी शिबीरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबीरांच्या वेळी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी आपापल्या केंद्रांवर वेळेत उपस्थित राहून नागरिकांकडून मतदार नोंदणी, माहितीतील दुरुस्ती तसेच नावे वगळण्याचे अर्ज भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता राहावी यासाठी राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (बीएलए) देखील या शिबीरांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला व दिव्यांग घटकांना मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिव्यांग संघटनांच्या सहकार्याने एकही पात्र दिव्यांग नागरिक नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शिबीराच्या ठिकाणी त्यांच्यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील नवविवाहित व वंचित महिलांची नावे नोंदवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. युवा वर्गाचा सहभाग वाढवण्यासाठी १ ऑक्टोबर, २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व युवा नागरिकांची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विशेष शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी व संबंधित प्राचार्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन नोंदणी प्रक्रिया पार पडण्याबाबत कळविण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामीण स्तरावरील यंत्रणांद्वारे या शिबीरांविषयी माहिती दिली जाणार आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) यांनी या विशेष शिबीरांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करावे. लातूर जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून सर्व संबंधित विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे लातूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पवार यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत