विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील विविध प्रलंबित कामांना गती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील विविध प्रलंबित कामांना गती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना ▪रुग्णालयाशी संबंधित कामांचा आढावा आणि पाहणी लातूर, दि. १० : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. रुग्णालयातील सेवा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध मुद्द्यांचा आढावा घेवून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाविद्यालयाच्या परिषद दालनात झालेल्या या बैठकीला लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. उदय माेहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. टेकाळे, भूमि अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक नसीम पटेल, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. नरवडे आणि अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह संबंधित इतर विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान रुग्णालयातील विविध कामांचा आढावा घेताना दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रशिक्षण केंद्राची जागा लवकरात लवकर दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी वर्ग करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाविद्यालय परिसरात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून फायर स्टेशन उभारण्यासाठी तातडीने संबंधित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, रुग्णालयात अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागामार्फत सातत्याने 'मॉक ड्रिल' आयोजित करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालय आणि रुग्णालयाशी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. रुग्णालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या माता बाल रुग्णालय तसेच क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या कामाची गती वाढवून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. रुग्णालय परिसरातील कचरा वेळोवेळी उचलला जावा आणि परिसरात फिरणाऱ्या मोकाट डुकरांचा व कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिका अधिकारीकाऱ्यांना दिल्या. यावर रुग्णालयाला २४ तास पाणीपुरवठा करणे तसेच वसतीगृह, महाविद्यालय आणि इतर विभागांसाठी स्वतंत्र मिटर बसवून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी बैठकीत सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी बैठकीनंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथील कामांची, अग्निशमन यंत्रणेची पाहणी केली. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत