लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत १४२ अर्ज दाखल

लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत १४२ अर्ज दाखल लातूर, दि. ११ : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे अधिक सुलभ व जलद व्हावे, या उद्देशाने लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकांद्वारे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पहिल्या दोन दिवसांत, म्हणजेच १० आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकूण २१ विशेष शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १४२ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती या अभियानाच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केले आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, लातूर तालुक्यात ६ शिबिरांच्या माध्यमातून सर्वाधिक ११८ अर्ज प्राप्त झाले आहेत. रेणापूर तालुक्यात २ शिबिरांमध्ये १४ अर्ज प्राप्त झाले, निलंगा तालुक्यात ४ शिबिरांमध्ये ५ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच जळकोट तालुक्यात १ शिबिर आयोजित करून ५ अर्ज प्राप्त झाले आहेत. या मोहिमेदरम्यान एकही अर्ज नाकारण्यात आलेला नाही. १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या अभियानाच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी केले आहे. या शिबिरांमध्ये जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि परिपूर्ण अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन व मदत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. पात्र लाभार्थ्यांना अत्यंत जलद गतीने प्रमाणपत्र वितरीत व्हावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पाठपुरावा करण्यात येत आहे. विशेष शिबिरांचे पुढील तीन दिवसांचे वेळापत्रक १२ सप्टेंबर २०२६ रोजी औसा तालुक्यातील लामजना मंडळ आणि निलंगा तालुक्यातील औराद शहा व पानचिंचोली मंडळांमध्ये शिबीरे पार पडतील. तसेच १३ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर तालुक्यातील चिंचोली ब. मंडळातील भिसेवाघोली, औसा तालुक्यातील मातोळा आणि जळकोट तालुक्यातील वांजरवाडा मंडळात शिबीरे घेतली जातील. यानंतर १४ सप्टेंबर २०२६ रोजी औसा तालुक्यातील भादा मंडळ आणि जळकोट तालुक्यातील शेलदरा मंडळ येथे शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. **

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत