लातूर जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियान
लातूर जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियान
लातूर, दि. १० (जिमाका): राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून येत्या १४ सप्टेंबर २०२६ रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणाऱ्या या उत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिनस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यात 'श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
हे आरोग्य अभियान यशस्वी करण्यासाठी लातूरचे धर्मादाय सह आयुक्त विद्याधर शे. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सहाय्यक धर्मादाय आयुक्त (धर्मादाय रुग्णालय) श्रीमती एस. जे. निंबाळकर यांनी उपस्थित विश्वस्त, प्रशासक व आरोग्य सेवकांना मार्गदर्शन करत सर्व धर्मादाय रुग्णालयांनी गणेश मंडळांच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हे अभियान नियमबद्ध पद्धतीने यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
वर्गणी संकलनासाठी धर्मादाय कार्यालयाची परवानगी बंधनकारक
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात वर्गणी संकलनाबाबतही धर्मादाय कार्यालयाकडून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील कलम ४१ (क) नुसार गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय कार्यालयची अधिकृत परवानगी घेणे सर्व मंडळांसाठी बंधनकारक आहे. सर्व गणेश मंडळांनी वेळेत अशी परवानगी प्राप्त करून घ्यावी, अन्यथा विनापरवानगी वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती एस. जे. निंबाळकर यांनी सांगितले.
**
Comments
Post a Comment