कुणबी जात प्रमाणपत्र विशेष शिबिरांना लातूर जिल्ह्यात सुरुवात; आज दुसऱ्या दिवशी १४ ठिकाणी शिबिरांचे आयोजन
कुणबी जात प्रमाणपत्र विशेष शिबिरांना लातूर जिल्ह्यात सुरुवात;
आज दुसऱ्या दिवशी १४ ठिकाणी शिबिरांचे आयोजन
लातूर, दि. ०९ : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा प्रारंभ आज, १० सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यातील लातूर मंडळ आणि गातेगाव मंडळातील मुरुड अकोला येथे झाला असून, याच दिवशी औसा तालुक्यातील औसा मंडळ, रेणापूर तालुक्यातील रेणापूर मंडळ, तसेच निलंगा तालुक्यातील निलंगा, हलगरा व कासार सिरसी या तीन मंडळांमध्ये शिबिरे झाली.
११ सप्टेंबर रोजी १४ ठिकाणी विशेष शिबिरे
११ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर तालुक्यातील मुरुड मंडळातील एकुर्गा, चिंचोली ब. मंडळातील पिंप्री अंबा, हरंगुळ बु. मंडळातील टाकळी आणि तांदुळजा मंडळातील भोसा येथे शिबीरे होतील. तसेच औसा तालुक्यातील किल्लारी, रेणापूर तालुक्यातील पानगाव, देवणी तालुक्यातील देवणी, जळकोट तालुक्यातील जळकोट, निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु., भुतमुगळी व कासार बालकुंदा, आणि उदगीर तालुक्यातील नळगीर, तोंडार व देवर्जन या मंडळांमध्ये विशेष शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिरांमध्ये जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि परिपूर्ण अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन व मदत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. पात्र लाभार्थ्यांना अत्यंत जलद गतीने प्रमाणपत्र वितरीत व्हावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पाठपुरावा करण्यात येत आहे.
*लातूर तालुक्यातील कासारगाव येथील शिबिराला उपविभागीय अधिकारी यांची भेट*
लातूर तालुक्यातील लातूर मंडळातील कासारगाव, कासारखेडा मंडळातील कासारखेडा तसेच गातेगाव मंडळातील मुरुड अकोला येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. कासारगाव येथील शिबिराला लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच शंकुतंला बालाजी बगाडे, नायब तहसीलदार गणेश सरोदे, उपसरपंच नंदु मोहिते यांच्यासह ग्रामस्थ , मराठा समाज बांधव उपस्थित होते. या शिबिरात कुणबी नोंद आढळलेल्या कुटुंबांना कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची व प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आढळून आलेल्या कुणबी नोंदी संबंधित गावांमध्ये पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील उपलब्ध कुणबी नोंदी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर latur.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली वंशावळ जुळविण्याची प्रक्रिया, संबंधित कागदपत्रे व कार्यपद्धती याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक अर्जाचे नमुने वितरित करण्यात आले.
मौजे मुरुड अकोला येथे आयोजित विशेष शिबिरात प्रभारी तहसीलदार सुजाता हंकारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच शिवराज बिडवे, केशव रोंगे व ग्रामस्थन उपस्थित होते. त्यांनी कुणबी नोंदी, वंशावळ जुळविणे, जात प्रमाणपत्र तसेच एसईबीसी प्रमाणपत्राबाबत माहिती जाणून घेतली.
*****
Comments
Post a Comment