१५ सप्टेंबरपर्यंत जिल्हास्तरावर पाठवावेत • लातूर समाज कल्याण सहायक आयुक्तांचे महाविद्यालयांना आवाहन
१५ सप्टेंबरपर्यंत जिल्हास्तरावर पाठवावेत
• लातूर समाज कल्याण सहायक आयुक्तांचे महाविद्यालयांना आवाहन
लातूर, दि. ११: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावरील पात्र अर्ज जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठविण्याकरिता जुने महाडीबीटी पोर्टल ११ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुन्हा सुरू करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या लॉगिनमध्ये प्रलंबित असलेले केवळ पात्र शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ तपासून जिल्हास्तरावर वर्ग करावेत, असे आवाहन लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
१५ सप्टेंबर २०२६ ही जुन्या पोर्टलवरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची अंतिम संधी असून या विहित मुदतीनंतर जुने पोर्टल कायमचे बंद करण्यात येणार आहे आणि त्याऐवजी 'MahaDBT 2.0' हे नवीन अद्ययावत पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित केले जाईल. मुदत संपल्यानंतर जुन्या प्रणालीवरील कोणताही प्रलंबित अर्ज स्वीकारला जाणार नाही व त्याची केंद्रहिश्श्याची रक्कम शासनाकडून अदा केली जाणार नसल्याने, तांत्रिक अडचणी निर्माण होऊन पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्व महाविद्यालयांनी वेळेत कार्यवाही पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या गांभीर्याने दखल घेऊन विहीत मुदतीत सर्व पात्र अर्ज मंजूर करून आपल्या स्तरावर 'झिरो पेंडन्सी' राखावी आणि विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करावे, अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
*****
Comments
Post a Comment