लातूर येथे २४ ऑक्टोबर रोजी महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा • जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

लातूर येथे २४ ऑक्टोबर रोजी महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा • जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन लातूर, दि. २३ : शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचावी आणि त्यांची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी, या उद्देशाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशांनुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता लातूर शहरातील सावेवाडी येथील दिवाणजी मंगल कार्यालय येथे महा विधी सेवा शिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि कायद्यांविषयी समाजात जागृती निर्माण करणे, विविध विभागांद्वारे राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे, तसेच पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत योजनांचे लाभ पोहोचवणे हा या शिबीराचा मुख्य हेतू आहे. याचबरोबर नागरिकांच्या कायदेशीर गरजा समजून घेऊन त्यांना योग्य कायदेशीर सल्ला देणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या महा विधी सेवा शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांमार्फत साधारणपणे ४० ते ५० विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या महा विधी सेवा शिबीरामध्ये प्रामुख्याने श्रमिक व मजूर, दिव्यांग व्यक्ती, बालकांशी निगडित मुद्दे, ट्रान्सजेंडर, कारागृहातील कैदी, अनुसूचित जाती व जमाती, ज्येष्ठ नागरिक, भिकारी व बेघर व्यक्ती, रस्ता सुरक्षा व अपघात, नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि मानवी तस्करीचे बळी ठरलेल्या घटकांशी संबंधित कायदेशीर हक्क व शासकीय योजनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या महा विधी सेवा शिबीराच्या पूर्वतयारीसाठी आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लातूर जिल्हा व सत्र न्यायालय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारूका आणि जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेवून आवश्यक सूचना दिल्या. या शिबीरास लातूर न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचेन्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे आणि न्यायमूर्ती सुशील एम. घोडेस्वार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवर न्यायमूर्तींच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येईल. तरी या महा विधी सेवा शिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यास सर्व नागरिक, पात्र लाभार्थी, शालेय विद्यार्थी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारूका, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर आणि लातूर वकील मंडळाचे अध्यक्ष शिवकुमार जाधव यांनी केले आहे. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत