जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी बांधवांसाठी 10 दिवसीय विपश्यना शिबीर संपन्न

 जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये

बंदी बांधवांसाठी 10 दिवसीय विपश्यना शिबीर संपन्न   

 

लातूर, दि. 09  (जिमाका) :  जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर घुगे यांनी दिनांक 2 सप्टेंबर, 2023 रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहास भेट दिली असता 18 ते 45 वयोगटातील अनेक तरुण कैदी येथे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, या तरुणाशी संवाद साधला असता हे तरुण दिशाहीन असून त्यांच्यासाठी दिशादर्शक वाटचालीसाठी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. कैद्यांमधील सूडाची भावना नष्ट करून मैत्रीभाव वाढला पाहिजे या जाणीवेतून जिल्हाधिकारी यांनी लातूर विपश्यना समितीच्या माध्यमातून लातूर येथील मध्यवर्ती कारागृहात विपश्यना शिबीराचे दि. 29 सप्टेंबर, 2023 ते 9 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत सकाळी आणि रात्री 40 बंदी बांधवांसाठी आयोजन करण्यात आले.

या शिबिरासाठी साधक कैद्यांची कारागृहातच स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच कैद्यांना साधनेसाठी स्वतंत्र ऑडिओ व्हिज्युअल (Audio Visual) सुसज्ज असा धम्म साधना कक्ष देखील तयार करण्यात आला होता. लातूर विपश्यना समितीचे 2 आचार्य व 3 सहायक हे देखील कैदी साधकांसाठी पूर्णवेळ कारागृहात उपस्थित होते.

विपश्यना कालावधीत कैद्यांसाठी विशेष आसन व्यवस्था व सात्विक भोजन व्यवस्था करण्यात आली होती. दि 9 ऑक्टोबर, 2023 रोजी सदरील शिबिराची सांगता झाली. सांगता सत्रामध्ये कैद्यांचे अभिप्राय थक्क करणारे होते.

विपश्यनेतून पुढील वाटचालीचा मार्ग गवसला आम्ही भूतकाळ विसरून वर्तमानात जगायला शिकलो, वैरभाव पूर्णपणे निघून गेला अशा प्रकारचा सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विपश्यना साधनेचा मूळ उद्देश हा परस्परातील द्वेष आणि द्रोह या दुर्गुणापासून सुटका सांप्रदायिक व संकुचित वृत्तीच्या बंधनातून मुक्ति, सुखी समजाचा स्वास्थ सुखी सदस्य बनणे, स्वमंगल आणि सर्वांचे मंगल या भावनांनी परिपूर्ण विधायक आणि सृजनात्मक जीवन सुधारणे हा असल्याने कैद्यांना हे विपश्यना शिबिर जीवनाच्या पुढील वाटचालीकरिता नक्कीच मार्गदर्शक ठरेल असे कैद्यांनी व्यक्त केलेल्या भावनेतून दिसून आले.

हे शिबीर आयोजित करण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सात्वंन साहेब यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच लातूर विपश्यना समितीचे श्री. भुतडा व श्री. बिरले यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक ते सहकार्य केले. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती प्रियांका आयरे यांनी या शिबिरासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाचे काम केले. भविष्यात बंदी बांधवांसाठी जिल्हा उद्योग केंद्र व कौशल्य विकास यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उद्योग प्रशिक्षण शिबीरे व कोर्सेस आयोजित केली जाणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी श्रीमती. वर्षा ठाकुर घुगे यांनी यावेळी सांगितले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु