जिल्हाधिकारी कार्यालय होणार ऊर्जा कार्यक्षम इमारत § स्वहितासाठी आणि राष्ट्र हितासाठी ऊर्जा बचत § अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या घरापासून अपारंपरिक ऊर्जा वापरायला करावी सुरुवात

 

जिल्हाधिकारी कार्यालय होणार ऊर्जा कार्यक्षम इमारत

 

§  स्वहितासाठी आणि राष्ट्र हितासाठी ऊर्जा बचत

§  अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या घरापासून अपारंपरिक ऊर्जा वापरायला करावी सुरुवात

 


लातूर, दि.23 (जिमाअ) : वीजेची वाढती मागणी, वीज निर्मितीचा वाढता खर्च, वीज निर्मितीसाठी लागणारे इंधन, त्यातून निर्माण होणारा पर्यावरण ऱ्हास या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपण वापरतो ती वीज किती मौल्यवान आहे हे लक्षात येईल. आता ऊर्जा संवर्धन साक्षरता अत्यंत गरजेची आहे, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ऊर्जा संवर्धानाचे पहिले पाऊल म्हणून वीज बचत चळवळ माझ्या कार्यालयापासूनच सुरु करणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज सांगितले.


जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांना ऊर्जा संवर्धनाचे महत्व समजावे म्हणून आज ऊर्जा विभाग, भारत सरकार प्रमाणित ऑडिटर केदार खामितकर यांचे सादरीकरण ठेवले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्यासह सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी म्हणाल्या, ऊर्जा संवर्धनाची सुरुवात आपल्या पासून करू या. अगोदर सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयात अत्यंत कमी ऊर्जा वापरायला सुरुवात करायची आहे. आता ही सवय लावून घ्यायची गरजे पूरतीच वीज वापरायची. घरी आपण जसे अधिक लाईट बिल येईल म्हणून लाईटचे बटन बंद करतो तीच सवय कार्यालयात लावून घ्यायची. थोड्या दिवसातच   जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागातील कार्यालयातील विद्युत दिवे आणि विद्युत उपकरण स्वयंचलीत केली जाणार असून व्यक्ती नसेल तर ऍटोमॅटिक हे सगळे बंद राहिल, अशी व्यवस्था निर्माण केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या घरीही अपारंपरिक ऊर्जा वापरायला सुरुवात करावी. जिल्ह्यात जनतेला सांगताना तो नैतिक अधिकार प्राप्त करायचा असेल तर हे करावचं लागेल. आता ही गोष्ट चळवळ म्हणून करावी लागेल तरच आपण ऊर्जा संवर्धन करू असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

सध्या आपण जी वीज वापरतो ती कोणकोणत्या इंधनाचा उपयोग करून निर्माण केली जाते. त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम, आपण वापरत असलेले इंधन पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा हे एक ना एक दिवस संपणार आहेत. त्याला पर्याय निर्माण होत आहेत. पण वीज वापरताना आपण ती अत्यंत निष्काळजीपणाने वापरतो. हे राष्ट्रीय नुकसान आहे. त्यामुळे ऊर्जा संवर्धन हे स्वहितासाठी व राष्ट्रहितासाठी करू या असा सल्ला एनर्जी ऑडीटर केदार खामितकर यांनी आज सर्व अधिकाऱ्यांना दिला. ऊर्जा वापरताना कशी संवर्धन करता येईल याबद्दलही त्यांनी सविस्तर सांगितले.

****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा