‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे 31 ऑक्टोबर रोजी लातूर येथे आयोजन · आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणण्याचे आवाहन
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे
31 ऑक्टोबर रोजी लातूर येथे आयोजन
· आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणण्याचे आवाहन
लातूर, दि. 27 (जिमाका) : दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता राज्य शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. लातूर येथील औसा रोडवरील थोरमोटे लॉन्समध्ये 31 ऑक्टोबर 2023 रोजी अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हे शिबीर होणार आहे. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा यासाठी समन्व्यक नेमून त्या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी घेतली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त रामदास कोकरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे, त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभियानांतर्गत आयोजित एकदिवसीय शिबिरामुळे दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र, त्याचबरोबर शेत जमिनी संबंधित कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त मदत होणार आहे. शासनाच्या विविध योजनातून तसेच सामाजिक संस्था यांच्या सीएसआर मधून उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणे देखील वाटप करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी येताना आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
******
Comments
Post a Comment