जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व्हॅक्युम लिटर पीकर (जटायु) मशिनचे लोकार्पण मनपाकडून यंत्राद्वारे होणार रस्त्यांची स्वच्छता
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व्हॅक्युम लिटर पीकर (जटायु) मशिनचे लोकार्पण
मनपाकडून यंत्राद्वारे होणार रस्त्यांची स्वच्छता
लातूर/प्रतिनिधी: मनपाकडून शहरातील रस्त्यावर पडलेला कचरा आता यंत्राद्वारे उचलला जाणार आहे.यासाठी मनपाने खरेदी केलेल्या व्हॅक्युम लिटर पीकर (जटायु) मशिनचे लोकार्पण बुधवारी (दि.२५ ऑक्टोबर)जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह अधिकाऱ्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ,दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम विभागाकडून लातूर शहर महानगरपालिकेला वायु प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी निधी उपलब्ध झाला.
या निधीमधुन लातूर शहर महानगरपालिके मार्फत शहरातील वायु प्रदूषण व घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपयोजना राबवण्यात येत आहेत.त्यापैकी शहरातील मेन रोड व अंतर्गत रस्त्यावरील कचरा व्हॅक्युम लिटर पीकर मशीनद्वारे गोळा-जमा करण्याकरिता चार मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत.
या व्हॅक्युम लिटर पीकर मशीनद्वारे शहरातील घनकचरा व्यवस्थित गोळा करण्याकरिता मदत होणार आहे.या मशीनमुळे कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त कचरा गोळा होणार आहे.कचरा उचलताना कमीत कमी मानवी संपर्क होणार आहे त्यामुळे मजुरांच्या आरोग्याला फायदा होणार आहे.
या व्हॅक्युम लिटर पीकर (जटायू) मशीनचे लोकार्पण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मशीनचे प्रात्यक्षिकही त्यांच्यासमोर सादर करण्यात आले.
यावेळी आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपायुक्त मयुरा शिंदेकर, जिल्हा सह-आयुक्त रामदास कोकरे ,सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे,स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे,महिला व बाल विकास अधिकारी रुक्मानंद वडगावे, पर्यावरण सल्लागार राहुल बोबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम विभागातील पंडित लोहारे,स्वच्छता निरीक्षक माधव गायकवाड,पद्माकर गायकवाड यांचीही यावेळी उपस्थिती होती.
Comments
Post a Comment