उदगीर शहरात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्मितीवर भर - ना. संजय बनसोडे

 







उदगीर येथील संजय नगर, म्हाडा कॉलनीतील सभागृह, सिमेंट रोडचे लोकार्पण

·         लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणार

·         डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्यासाठी निधी

·         अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजासाठी आठ सभागृहे, अंतर्गत रस्ते मंजूर

·         भूमिगत गटार योजनेसाठी 335 कोटींचा आराखडा तयार

·         अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना

लातूर, दि. 21 (जिमाका) : उदगीर शहरातील विविध विकास कामांसाठी भरीव निधी आणून शहरातील नागरिकांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे. शहरातील भूमिगत गटार योजनेचा 335 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. तसेच शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेंतर्गत संजय नगर येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह आणि म्हाडा कॉलनी येथे उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह व अंतर्गत सिमेंट रस्त्याचा लोकार्पणप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. उदगीरचे उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषद प्रशासक सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवर यांच्यासह कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाँ पठाण, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी नगरसेवक मनोज कपाळे, श्रीरंग कांबळे, समीर शेख, राजकुमार भालेराव, फय्याज शेख, बबिता भोसले, रेखा कानमंदे आदी यावेळी उपस्थित होते.

उदगीर शहरातील नागरिकांना रस्ते, वीज, आरोग्याच्या सुविधा देण्यावर विशेष भर आहे. त्याचबरोबर विविध समाजाच्या लोकवस्तीमधील पायाभूत सुविधांविषयक प्रश्न सोडविण्याचा प्राधान्य देण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार योजनेंतर्गत शहरात 8 सभागृह आणि रस्ते, नालीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी संजय नगर आणि म्हाडा कॉलनी येथील सभागृहाचे लोकार्पण होत असून उर्वरीत कामेही लवकरात लवकर पूर्ण होतील, असे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच शहरात विविध ठिकाणी मोहल्ला क्लिनिक उभारण्यासाठी प्रयत्न आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय आढावा घेवून आवश्यक पायाभूत सुविधांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही ना. बनसोडे यांनी केल्या.

उदगीर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 15 फुटी पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, तसेच पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठीही अतिरिक्त 50 ते 60 लक्ष रुपयांचा नधी देणार असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जळकोट शहरातही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच उदगीर व जळकोट शहरात समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी सुमारे 15 कोटींचा प्रस्ताव

उदगीर शहरातील तळवेस येथे भव्य बौद्धविहार उभारण्यात येत असून यासाठी आतापर्यंत सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सुमारे 15 कोटी रुपयांच्या या प्रस्तावाच्या मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे ना. संजय बनसोडे यांनी सांगितले. हे स्मारक राज्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, असा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जळकोट, उदगीर एमआयडीसी लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न

स्थानिक युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी उदगीर आणि जळकोट येथे एमआयडीसी मंजूर करून घेतली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा आढावा घेण्यासाठी नुकताच लातूर दौरा केला असून या दोन्ही एमआयडीसी लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी योग्य जागेची निवड करून एमआयडीसी सुरु करण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. तसेच उदगीर शहराला लातूर, नांदेड, बिदर यासारख्या महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असल्याने दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

संजय नगर आणि म्हाडा कॉलनी येथील नागरिकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून सभागृह, रस्त्याच्या कामाबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी क्यातमवार यांनी केले. सूत्रसंचलन प्रदीप जोंधळे व खंडु सोनकांबळे यांनी केले.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु