मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रांवर प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत
सर्व मतदान केंद्रांवर प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध
लातूर, दि. 26 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम 2024 अंतर्गत शुक्रवार, 27 ऑक्टोबर, 2023 रोजी सर्व मतदान केंद्र, तहसिल कार्यालय, उप विभागीय अधिकारी कार्यालयात, तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तद्नंतर 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर, 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे मतदार यादीतील नोंदणीच्या दुरुस्तीचे अथवा वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुषंगाने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 अंतर्गत शनिवार, 4 नोव्हेंबर व रविवार, 5 नोव्हेंबर, शनिवार, 25 नोव्हेंबर, रविवार, 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष शिबिरात मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) पात्र नागरीकांची मतदार नोंदणी, दुरुस्ती अथवा वगळणीचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार हे विशेष शिबिरांना भेटी देवून तेथील कामकाजाचे पर्यवेक्षण व मागर्दशन करतील. अधिकाधिक मतदारांना नाव नोंदणी करता यावी, यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेवून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment