अधिसूचित सेवांचा लाभ नियत कालावधीत देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करावे - राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव
अधिसूचित सेवांचा लाभ नियत कालावधीत देण्यासाठी
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करावे
-
राज्यसेवा हक्क
आयुक्त डॉ. किरण जाधव
·
महाराष्ट्र लोकसेवा
हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा
·
नियत कालावधीत
अर्जांच्या निपटाऱ्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना
लातूर, दि. 19 (जिमाका) : नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळावी, यासाठी राज्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गत अधिसूचित विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना नियत कालावधीत देण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करावे, अशा सूचना छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी आज येथे दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अपर जिल्हाधिकारी
सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, विलासराव देशमुख शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे
यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त अर्जांचा निपटारा नियत कालावधीत होण्याचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. अर्ज प्रलंबित राहू नयेत, यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी नियमितपणे आढावा घेवून पाठपुरावा करावा. तसेच प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा वार्षिक अहवाल तयार करून अधिनियमांतर्गत आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. जाधव यांनी यावेळी दिल्या.
नागरिकांना जास्तीत जास्त सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रांमधून त्यांना उपलब्ध होवू शकणाऱ्या सेवांची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी, असे राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. जाधव यांनी सांगितले. तसेच काही सेवा ह्या विविध विभागांशी संबंधित असून त्याबाबतचे अर्ज निकाली काढताना संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाविषयी मार्गदर्शन
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा नागरिकांना लाभ देताना करावयाची कार्यवाही, अधिनियमातील विविध कलमांतील तरतुदी, आपले सरकार सेवा केंद्र, अपिलावरील कार्यवाही, अपिलीय अधिकारी यांची कर्तव्ये आदी बाबींविषयी राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी यांनी मार्गदर्शन केले. तसेच सेवा महिना कालावधीत निकाली काढलेले अर्ज, तसेच या वर्षातील प्राप्त अर्ज व निकाली काढलेले अर्ज, अपिलांवरील कार्यवाही आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाला भेट देवून तेथील सुविधांची माहिती घेतली.
ग्रामीण भागातील नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत
अधिसूचित सेवांचा लाभ अधिक गतीने मिळावा, यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांकरिता
कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. तसेच त्यांच्याकडे प्राप्त अर्जांचा तातडीने
निपटारा होण्यासाठी नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी ‘मराठवाडा मुक्तिगाथा : लातूर विशेष’ हा
ग्रंथ भेट देवून राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांचे स्वागत केले. यावेळी
प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास भेट
अधिसूचित सेवांबाबत कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी राज्यसेवा हक्क आयुक्त
डॉ. किरण जाधव यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस
अधीक्षक सोमय मुंडे यांनी अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. डॉ. जाधव
यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून महाराष्ट्र
लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर
त्यांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास भेट देवून अधिसूचित सेवांच्या
अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.
राऊत उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment