सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालतीसाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची तयारी बैठक
लातूर, दि. २५ : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली
आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने 'समाधान
समारोह' या उपक्रमांतर्गत आगामी २१ ते २३ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात
आले आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये लातूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांमध्ये
सौहार्दपूर्ण तडजोड घडवून आणण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या विविध
विभागांची एक महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक गुरुवारी लातूर जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण कार्यालयात झाली. ही बैठक लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय
भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली होती.
लातूर जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालय येथे
दाखल करण्यात आलेली सर्व प्रकारची प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी व दिवाणी प्रकरणे
या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बँकींग, दिवाणी दावे, मोटार वाहन अपघात
नुकसान भरपाई, ग्राहक तक्रार निवारण, परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ (धनादेश अनादर/चेक बाऊन्स प्रकरणे),
कौटुंबिक वाद, कामगार व औद्योगिक वाद,
भूसंपादन प्रकरणे आणि सेवेशी संबंधित (सर्व्हिस मॅटर्स)
प्रकरणांचा समावेश असणार आहे. पक्षकारांमध्ये आपसांतील वाद सामोपचाराने मिटवून
सौहार्दपूर्ण तडजोड व्हावी, यावर या बैठकीत भर देण्यात
आला.
या पूर्वतयारी बैठकीला लातूरच्या उपजिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एम. बावकर, निलंगा उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार एस.ए. कानडे आणि लातूर टीएमसी सेलचे सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. मनाळे उपस्थित होते.
*****

Comments
Post a Comment