लातूर तालुक्यात मुरुड बु. येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध • ७ जुलै पर्यंत हरकती किंवा सूचना सादर करण्याचे आवाहन

* वृत्त क्र. : 415* लातूर तालुक्यात मुरुड बु. येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध • ७ जुलै पर्यंत हरकती किंवा सूचना सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. २३ : लातूर तालुक्यामध्ये नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली असून या कार्यालयाचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करणारी प्रारूप अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे-विरोळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या नियमांनुसार ही प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. यानुसार मुरुड बु. येथील अपर तहसीलदार अधिकारी यांच्याकडे लातूर तहसीलदार यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ किंवा त्या-त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये त्यांच्याकडून नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी प्रत्यार्पित करण्याचे योजिले असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या अधिसूचनेनुसार मुरुड बु. येथील ग्रामपंचायत इमारत किंवा ग्रामसेवक क्वार्टर येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय असणार आहे. या नवीन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण ३ महसूल मंडळे समाविष्ट करण्यात आली असून यामध्ये मुरुड बु., चिंचोली (ब.) आणि तांदुळजा या मंडळांचा समावेश आहे. या तिन्ही मंडळांतर्गत येणारे एकूण १८ साझे आणि ४३ गावे, वाड्या व तांडे या कार्यालयाच्या अखत्यारीत राहतील. या नवीन रचनेमुळे तहसीलदार लातूर यांचे महसूल संहितेअंतर्गत असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये आता मुरुडच्या अपर तहसीलदारांकडे त्यांच्या क्षेत्रापुरती प्रत्यार्पित केली जाणार आहेत. या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप अधिसूचनेबाबत नागरिकांना काही हरकती किंवा सूचना मांडायच्या असल्यास, त्यांनी दिनांक ७ जुलै २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेन रोड, तहसील कार्यालयासमोर, लातूर येथे समक्ष हजर राहून त्या सादर कराव्यात, जेणेकरून प्राप्त झालेल्या हरकती व सूचना पुढील कार्यवाहीसाठी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील, असे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे-विरोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत