‘नीट-युजी २०२६’ परीक्षा तयारीचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्याकडून आढावा
*वृत्त क्र. : 399*
‘नीट-युजी २०२६’ परीक्षा तयारीचा
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्याकडून आढावा
लातूर, दि. १६ : येत्या २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या ‘नीट-युजी २०२६’ या परीक्षेच्या अनुषंगाने लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्याया बैठकीत परीक्षेच्या नियोजनबद्ध आणि पारदर्शक आयोजनासाठी संबंधित विभागांना सविस्तर सूचना देण्यात आल्या.
उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. महेंद्र गायकवाड आणि महेश सूर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात एकूण २६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये लातूर येथील १९, अहमदपूर येथील २, उदगीर येथील २, निलंगा येथील २ आणि चाकूर तालुक्यातील चापोली येथील एका परीक्षा केंद्राचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडावी आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये, यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्युटी मॅजिस्ट्रेट’ आणि ‘स्टेट ऑब्झर्वर’ यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष
परीक्षेच्या दिवशी, म्हणजेच २१ जून २०२६ रोजी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक किंवा इतर कोणतीही अडचण आल्यास, तिचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२३८२-२२०२०४ असा असून, विद्यार्थी व पालकांना गरजेच्या वेळी यावर संपर्क साधता येईल. तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि कोणत्याही आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष वैद्यकीय पथके नियुक्ती करण्यात येणार आहेत.
***
Comments
Post a Comment