लातूर, दि. २६ (जिमाका): राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय
दिनानिमित्त लातूर येथे समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी व संविधान जनजागृती
प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला लातूर शहरातील नागरिक,
विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत
बास्टेवाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
करण्यात आला. तसेच हिरवी झेंडी दाखवून या प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
राहुल कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, समाज कल्याण प्रादेशिक
उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी
संतोषकुमार नाईकवाडी, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले यांची यावेळी प्रमुख
उपस्थिती होती.
राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय
प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते आणि समाजातील दुर्लक्षित, मागासवर्गीय, दिव्यांग,
वृद्ध, निराधार व दुर्बल घटकांच्या
प्रती त्यांचा दृष्टिकोन विशेष सहानुभूतीचा व सुधारणावादी होता. त्यांनी या
घटकांच्या कल्याणार्थ अनेक निर्णय अंमलात आणले. राजर्षी शाहू महाराजांचा हाच आदर्श
समाजापुढे यावा या दृष्टिकोनातून त्यांचा जन्मदिवस २६ जून हा प्रतिवर्षी ‘सामाजिक
न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित समता
दिंडी व संविधान जनजागृती प्रभातफेरीच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या
उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर प्रभातफेरीला सुरुवात झाली. साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा-गंजगोलाई-महात्मा गांधी चौक मार्गे भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आल्यानंतर या प्रभातफेरीचा समारोप करण्यात आला
या समता दिंडी व संविधान जनजागृती
प्रभातफेरीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये
याबाबात जनजागृती करण्याच्या दृष्टीने संविधानातील कायद्यासमोर समानता, भेदभाव प्रतिबंध, अस्पृश्यता
प्रतिबंध, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार व कर्तव्ये
या विविध अनुच्छेदांची तसेच अस्पृश्यता निर्मूलनाची माहिती असलेल्या घोषणावाक्यांचे
फलक हाती घेवून जनजागृती केली. लातूर शहरातील ज्ञानेश्वर विद्यालय, यशवंत
विद्यालय, देशिकेंद्र विद्यालय, राजमाता जिजामाता माध्यमिक विद्यालय, राजस्थान
माध्यमिक विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय आणि व्यंकटेश माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी
यांनी या समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.
Comments
Post a Comment