'अमृत मानस मित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी

वृत्त क्र. : 423 'अमृत मानस मित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी · २९ जून पर्यंत ऑनलाईन अर्जांचे आवाहन *लातूर, दिनांक २४ (जिमाका):* विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’च्या वतीने ‘अमृत मानस मित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था 'महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था', पुणे ही तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, ॲक्टिव्ह लिसनिंग, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य या विषयांवर आधारित असलेल्या या अभिनव उपक्रमांतर्गत सहभागी उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यक्षम समुपदेशक म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला असून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना 'अमृत' व 'एमआयएमएच' यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारित शिक्षण, समाजाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगार क्षमतेवर आधारित असलेल्या या मोफत प्रशिक्षणाचे स्वरूप पुणे येथे प्रथम १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण, इंटरॲक्टिव्ह सेशन्स, केस स्टडीज, प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीज आणि तज्ञांचे मार्गदर्शन असे असेल; ज्यानंतर जिल्हा पातळीवरील शाळा-महाविद्यालयांशी जोडून एक महिना प्रॅक्टिकल फिल्ड एक्सपोजर दिले जाईल आणि पुढील ३ ते ५ महिने प्रत्यक्ष व्यवसायासाठी ‘एमआयएमएच’च्या तज्ञांद्वारे नियमित ऑनलाईन सत्र, केस डिस्कशन, मेंटोरिंग आणि व्यावसायिक मार्गदर्शनासह कौशल्य वृद्धीसाठी सतत पाठबळ दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी एम.ए./एम.एससी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एससी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदव्युत्तर पदवी असलेले 'अमृत'च्या लक्षित गटातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यामध्ये या क्षेत्रात पूर्वीपासून कार्यरत व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असले तरी प्रशिक्षणासाठी आवश्यक निवास, भोजन व राहण्याची व्यवस्था उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने करावयाची असून इच्छुकांनी https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करायचा आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून ओरिएंटेशन सत्र, परीक्षा आणि मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केली जाईल आणि पहिल्या बॅचसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जून २०२६ पर्यंत आहे. वाढत्या मानसिक गरजा लक्षात घेता हा उपक्रम केवळ प्रमाणपत्र अभ्यासक्रम नसून प्रत्यक्ष कौशल्य विकास, फिल्ड अनुभव आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाचा समन्वय साधणारा राज्यातील एक अभिनव उपक्रम असून मानसिक आरोग्य क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे मत पुणे येथील ‘एमआयएमएच’चे तज्ञ डॉ. कापसे यांनी व्यक्त केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत