विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध कर्ज योजना; ऑनलाईन अर्जांचे आवाहन

वृत्त क्र. : 421 विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध कर्ज योजना; ऑनलाईन अर्जांचे आवाहन लातूर, दिनांक २४ (जिमाका): वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी जिल्ह्यातील पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी महामंडळाच्या www.vnvjntdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, लोहार समाजासाठी ब्रह्मलीना आचार्य पुराजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ आणि नाथपंथीय समाजासाठी श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ अशी सहा उपकंपनी महामंडळे स्थापन केली आहेत. या सर्व महामंडळांचे कामकाज मुख्य महामंडळांतर्गतच सुरु असून मुंबई येथील मुख्यालयाकडून सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हास्तरावर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, थेट कर्ज योजना आणि बीज भांडवल कर्ज योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत असून, यासाठी अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील आणि १८ ते ४५ वर्षे वयोगटातील असावा. तसेच त्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. दुसरी योजना गट कर्ज व्याज परतावा योजना असून तिची मर्यादा १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत आहे, ज्यासाठी नोंदणीकृत गटातील सदस्यांचे वय १८ ते ४५ वर्षे असावे आणि नॉन-क्रीमीलेअरसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत असावी. तसेच महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या १ लाख रुपयांच्या थेट कर्ज योजनेसाठी दोन जामीनदार व बोजा नोंद करून देणे आवश्यक असून यासाठी वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत असावे लागते. याशिवाय बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के बीज भांडवल योजनेमध्ये बँकेचा सहभाग ७५ टक्के तर महामंडळाचा सहभाग २५ टक्के असतो आणि या योजनेसाठीही १ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा आणि संबंधित व्यवसायाचे कोटेशन किंवा परवाना यांसारखी सर्व मूळ कागदपत्रे महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करून ऑनलाईन अर्ज भरणे गरजेचे आहे. लातूर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अथवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vnvjntdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, गुळ मार्केट समोर, जुनी डाल्डा फॅक्ट्री, लातूर येथील जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, तसेच अधिक चौकशीसाठी ०२३८२-२९९६०७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक पी. एम. झोंबाडे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत