जलसंधारण दिन विशेष 'महा वॉकेथॉन' आणि जल संवर्धनाचा संकल्प

जलसंधारण दिन विशेष 'महा वॉकेथॉन' आणि जल संवर्धनाचा संकल्प मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेला लातूर जिल्हा. जिल्ह्यासाठी 'पाणी' हा विषय महत्त्वाचा. गेल्या काही दशकांत आपण भूजल पातळीतील घट अनुभवली. जमिनीखालील जलस्तराचा अभ्यास केल्यास प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने २१ ऑगस्ट हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केला आहे, जो लातूरच्या जलचळवळीला नवी दिशा देणारा ठरणारा आहे, यावर आधारित हा विशेष लेख. जलसाधनेचा महामहोत्सव माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा मूलमंत्र देऊन राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी केली. त्यांच्या गौरवार्थ २१ ऑगस्ट हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होत आहे. लातूर जिल्ह्यात या दिवशी आयोजित होणारी 'महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर' ही केवळ एक रॅली नाही, ती आपल्या पाण्यासाठी केलेली एक प्रतिज्ञा आहे. "माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील पिढीसाठी त्यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. "लातूरकरांनी नेहमीच एकत्र येण्याची वृत्ती दाखवली आहे. या वॉकेथॉनमध्येही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून 'जलसंवर्धनासाठी तीन किलोमीटर' चालणार आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा: तांत्रिक दृष्टिकोन लातूरची भौगोलिक रचना पाहता, येथील भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला 'पाणलोट क्षेत्र विकास' आणि 'भूजल पुनर्भरण' यावर भर देणे अनिवार्य आहे. मोठ्या धरणांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्थानिक पातळीवर पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे अधिक शाश्वत आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आपण मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व ओळखले पाहिजे. जेव्हा आपण तीन किलोमीटर चालणार आहोत, तेव्हा आपण केवळ अंतर कापत नाही, तर आपण आपल्या जमिनीतील ओलावा आणि समृद्धीसाठी चालत आहोत. 'रील्स'च्या माध्यमातून युवकांचा जलसंवाद आजची युवा पिढी तंत्रज्ञानात प्रगत आहे. या अभियानांतर्गत १५ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी 'मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा' पार पडली. #SaveSoilSaveWater या हॅशटॅगसह लातूरच्या जलसंधारण कामांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. हे केवळ मनोरंजन नाही, एक 'डिजिटल लोकचळवळ' आहे. लातूरचा युवक जेव्हा आपल्या गावातील शेततळे किंवा बंधाऱ्याचा व्हिडिओ जगाला दाखवेल, तेव्हा ती खऱ्या अर्थाने जलजागृती ठरेल. "एक Reel... मातीसाठी, एक Reel... पाण्यासाठी!, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !" हा मंत्र या सप्ताहात प्रत्येकाच्या मोबाईलवर निनादला आहे. महाराष्ट्र युवा जलदूत नावाने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रकासहित प्रथम पुरस्कार 25 हजार, द्वितीय पुरस्कार 15 हजार आणि तृतीय पुरस्कार 10 हजार मिळणार आहे. शाश्वत उपाययोजना: वृक्षारोपण आणि शोषखड्डे जलसंधारण अभियानाचा एक भाग म्हणून १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी २०२७ पर्यंत विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये 'एक शाळा-एक शोषखड्डा' आणि 'एक पेड माँ के नाम' यांसारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. शाळांमधील पाण्याचे योग्य पुनर्भरण करणे, जिल्ह्यातील जमिनीची धूप रोखणे आणि आर्द्रता टिकवणे. जलसाठ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण आदींचा समावेश आहे. जलप्रतिज्ञा: भविष्यासाठी बांधिलकी या अभियानाचा आत्मा 'मृद व जलसंधारणाची शपथ' हा आहे. लातूरच्या प्रत्येक नागरिकाने, मग तो शेतकरी असो, डॉक्टर असो की विद्यार्थी, ही शपथ कृतीत उतरवणे आवश्यक आहे. आपण जेव्हा म्हणतो की, "मी पाण्याचा प्रत्येक थेंब जपेन," तेव्हा ती लातूरला अधिक समृद्धशाली होण्या साठीची ग्वाहीच असेल. लातूर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष म्हणून या उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. पोलीस प्रशासन, एनसीसी, एनएसएस आणि सर्व स्वयंसेवी संस्थांनी या महा वॉकेथॉनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून लातूरला 'जलयुक्त' करण्यासाठी पुढे आले आहेत. महा वॉकेथॉन ही केवळ एक दिवसाची औपचारिकता नाही. आज आपण जे पाणी वापरत आहोत, ते आपण आपल्या पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळालेले नाही, तर ते आपण आपल्या येणाऱ्या पिढीकडून 'कर्ज' म्हणून घेतलेले आहे. ते फेडण्यासाठी आपल्या लातूरची भूजल पातळी वाढवण्यासाठी आपण सर्वच कटीबद्ध आहोत. तर चला २१ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता, जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उपस्थित राहण्यासाठी घराबाहेर पडूया, महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊया... आणि लातूरला जलसमृद्ध करण्याचा संकल्प करूया! पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त लातूर घडवा! - डॉ. श्याम टरके, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास