बीएच सिरिज वाहनांचा थकीत कर भरणा करावा उदगीर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांचे आवाहन
बीएच सिरिज वाहनांचा थकीत कर भरणा करावा
उदगीर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांचे आवाहन
लातूर, दि. १९ (जिमाका) : भारत (बीएच) सिरिजमध्ये नोंदणी झालेल्या वाहनधारकांनी वाहनाचा थकीत कर विहित मुदतीत भरावा, असे आवाहन उदगीर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५१ (ब) अन्वये बीएच (भारत) सिरिजमध्ये वाहन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वारंवार बदली होणारे केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी, केंद्र व राज्य सार्वजनिक उपक्रम तसेच काही शासकीय संस्थांतील कर्मचारी आणि चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्ये अथवा केंद्रशासित प्रदेशांत कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांतील पात्र कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येतो.
केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५१ (बी) (३) नुसार बीएच सिरिज वाहनांचा कर आकारला जातो. या वाहनांचा १५ वर्षांचा कर एकत्रित न भरता दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा दोनच्या पटीत कर भरावा लागतो.
दोन वर्षांचा कराचा कालावधी संपल्यानंतर कर भरण्यासाठी सात दिवसांचा सवलतीचा कालावधी देण्यात येतो. या कालावधीनंतर म्हणजे आठव्या दिवसांपासून कर भरेपर्यंत देय करावर दरमहा दोन टक्के व्याज तसेच दररोज १०० रुपये शास्ती आकारण्यात येते.
बीएच सिरिज वाहनधारकांनी कराची मुदत संपण्यापूर्वीच www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन कर भरणा करावा. तपासणीदरम्यान थकीत कर असलेली वाहने आढळल्यास वायुवेग पथकाकडून वाहन जप्त करण्याची कारवाई केली जाईल, याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उदगीर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अय्यर यांनी केले आहे.
***
Comments
Post a Comment