लातूर जिल्ह्यातील चार बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अंतिम दत्तक विधान आदेश पारित
लातूर जिल्ह्यातील चार बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब;
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अंतिम दत्तक विधान आदेश पारित
लातूर, दि. ३० : बालकांना सुरक्षित, प्रेमळ व कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक प्रक्रियेमध्ये लातूर जिल्ह्यासाठी आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील तीन बालकांच्या देशांतर्गत व एका बालकाच्या आंतरदेशीय दत्तक प्रकरणांमध्ये आज लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या माध्यमातून अंतिम दत्तक विधान आदेश पारित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे या चारही बालकांना आता कायमस्वरूपी कुटुंब, आई-वडिलांचे प्रेम, माया व सुरक्षित भवितव्य मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
पूर्वी 'कारा' दत्तक नियमावली २०१७ नुसार देशांतर्गत तसेच आंतरदेशीय दत्तक प्रकरणांतील अंतिम आदेश पारित करण्याची प्रक्रिया जिल्हा न्यायालयामार्फत पार पाडली जात होती. तथापि, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील सुधारित कायदेशीर तरतुदींनुसार दत्तक प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत. या नवीन प्रक्रियेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालय दाखल याचिका क्रमांक १८८५/२०२३ मध्ये 'जैसे थे' आदेश पारित झाल्यामुळे काही काळ दत्तक प्रकरणांची कार्यवाही न्यायालयात सुरू होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय यांनी ४ मे २०२६ रोजी अंतिम आदेश पारित केल्यानंतर आणि संबंधित शासन व प्राधिकरणांकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक निर्देशांनुसार प्रलंबित दत्तक प्रकरणे जिल्हा न्यायालयातून काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची कार्यवाही जलद गतीने पार पाडण्यात आली.
त्यानुसार लातूर जिल्ह्यातील या चार बालकांच्या दत्तक प्रकरणांचे प्रस्ताव लातूर जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यामार्फत सर्व आवश्यक कागदपत्रे व केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण यांचे ना-हरकत प्रमाणपत्र यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. या चार प्रकरणांमध्ये तीन देशांतर्गत तर एका आंतरदेशीय प्रकरणाचा समावेश आहे. संबंधित दत्तक इच्छुक पालकांची 'कारा' पोर्टलवर झालेली नोंदणी, बालकांसोबत ऑनलाईन मॅचिंग, बाल कल्याण समितीमार्फत बालकांना दत्तकासाठी दिलेली कायदेशीर मुक्तता, तसेच आवश्यक पडताळणी व इतर निर्धारित प्रक्रिया कायदेशीर नियमांनुसार पूर्ण करण्यात आली होती.
आज, ३० ऑक्टोबर रोजी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी या चारही प्रकरणांची प्रत्यक्ष सुनावणी घेऊन अंतिम दत्तक विधान आदेश पारित केले, ज्यामुळे संबंधित इच्छुक पालकांना कायदेशीररीत्या बालकांचे पालकत्व स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, जिल्हा संरक्षण अधिकारी गणेश जोंधळे, परिवीक्षा अधिकारी रोहित मोहिते व धनंजय जवळगे तसेच बाल संरक्षण अधिकारी सिताराम कांबळे यांनी काम केले.
****
Comments
Post a Comment