कुणबी दाखले वितरणासाठी लातूर तालुक्यात 15 गावांमध्ये गुरुवारी विशेष शिबिराचे आयोजन

 

कुणबी दाखले वितरणासाठी लातूर तालुक्यात

15 गावांमध्ये गुरुवारी विशेष शिबिराचे आयोजन

लातूर, दि. 17 (जिमाका):  राज्य शासनाने 31 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे कुणबी जात प्रमाणपत्र करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार कुणबी नोंदी आढळलेल्या लातूर तालुक्यातील 15 गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी गुरुवार, 18 जानेवारी 2024 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे- विरोळे यांनी कळविले आहे.

लातूर तालुक्यात कासरगाव, खंडाळा, खुलगापूर, खुंटेफळ, कोळपा ममदापूर, मांजरी, मुरुड अकोला, पिंपळगाव अंबा, रामेश्वर, सावरगाव, एकुर्गा, हिसोरी, पिंपरी अंबा व वाडीवाघोली अशा एकूण 15 गावांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. या नोंदीची माहिती लातूर जिल्हाधिकारी कार्यालायाच्या  https://latur.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. कुणबी नोंदीधारकांच्या वारसांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्याचे काम सद्यस्थितीत सुरु असून आढळून आलेल्या नोंदीवरुन वारस शोधण्यासाठी महसूल विभाग, भूमी अभिलेख विभागातील खासरा पहाणी, पाहणीपत्रक, कुळ रजिष्टर, जुने फेरफार, सातबारा, टिपण, गुणाकार बुक, योजना व सलेवार या अभिलेख्यांच्या आधारे अर्जदारांना मदत होऊ शकते. हे सर्व जुने अभिलेखे महाराष्ट्र शासनाच्या https://mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर विनामुल्य उपलब्ध आहेत. यासाठी वरील लिंकवर आवश्यक ती माहिती भरुन आपली नोंदणी करुन घ्यावी. जेणेकरुन जनतेस सर्व अभिलेखे तात्काळ मिळणे सोयीचे होईल. हे अभिलेखे पाहण्यासाठी किंवा प्रत मिळविण्यासाठी  तहसिल कार्यालय अथवा भूमी अभिलेख कार्यालय येथे प्रत्यक्षात जाण्याची गरज नाही. तसेच वारस शोधण्यासाठी या अभिलेख्यांची सर्व सामान्य नागरिकांना मदत मिळू शकते.

लातूर तालुक्यात कासरगाव, खंडाळा, खुलगापूर, खुंटेफळ, कोळपा ममदापूर, मांजरी, मुरुड अकोला, पिंपळगाव अंबा, रामेश्वर, सावरगाव, एकुर्गा, हिसोरी, पिंपरी अंबा व वाडीवाघोली या 15 गावांमध्ये 18 जानेवारी 2024 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये कुणबी नोंदीधारक यांच्या वारसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि महाभूमी संकेतस्थळावरून आवश्यक अभिलेखे उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच कुणबी नोंदीधारक यांच्या वारसांनी जास्तीत जास्त प्रमाणात कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे अवाहन श्रीमती नऱ्हे- विरोळे यांनी केले आहे.

******

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु