स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका आणि पुस्तके पाठविण्याचे आवाहन

                                       स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी

31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका आणि पुस्तके पाठविण्याचे आवाहन

 

लातूर दि. 5 (जिमाका): मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी 2023 या प्रकाशन वर्षासाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात प्रवेशिका आणि पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2022 Extension of period for sending Books and Application Form' शीर्षाखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ http://sahitya.marathi.gos.in या संकेतस्थळावर प्रवेशिका नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरून आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 31 जानेवारी 2024 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक किंवा प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक किंवा प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य 1 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

लेखक किंवा प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर, पाकीटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु