महिला बचतगटांच्या प्रभाग संघ, ग्रामसंघांच्या कार्यालय इमारतीला निधी देणार - आमदार अभिमन्यू पवार

 

महिला बचतगटांच्या प्रभाग संघ, ग्रामसंघांच्या कार्यालय इमारतीला निधी देणार - आमदार अभिमन्यू पवार

 




महिला बचतगट शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग उभारावेत - प्रवीणसिंह परदेशी

लातूर, दि. 25 (जिमाका): महिला बचतगटामार्फत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत जास्तीत जास्त कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच महिला बचतगटांच्या प्रभाग संघ, ग्रामसंघांना गावातील शासकीय इमारती, सभागृहामध्ये कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्र) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी दिल्या. तसेच गावामध्ये सभागृह अथवा शासकीय इमारत उपलब्ध नसल्यास प्रभाग संघ, ग्राम संघ कार्यालय उभारणीसाठी आमदार निधीतून 5 लाख रुपये आणि जिल्हा नियोजन समितीमधून 5 लाख रुपये देण्यात येतील, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

औसा तहसील कार्यालयातील प्रशासकीय सभागृहात उमेद व औसा पंचायत समितीमार्फत आयोजित महिला सक्षमीकरण आढावा बैठकीत आमदार श्री. पवार आणि श्री. परदेशी बोलत होते. यावेळी त्यांनी महिला बचतगटामार्फत ‘स्मार्ट’ प्रकल्प अंतर्गत उद्योग उभारणीचाही आढावा घेतला.

 राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पचे आर. एस. पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, माविमचे जिल्हा व्यवस्थापक मन्सूर पटेल यावेळी उपस्थित होते.

स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीकडून उद्योग सुरु करण्यासाठी येणारे जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक आहे. तसेच पशुपालन, कुक्कुटपालन प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या प्रकल्पांसाठी असलेली कमाल 5 कोटीची मर्यादा शिथिल करून त्यापेक्षा जास्त किंमतीचे प्रकल्पही या योजनेतून मंजूर करणे आवश्यक असल्याचे आमदार श्री. पवार म्हणाले.

उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचतगटांच्या ग्रामसंघांच्या कार्यालयासाठी गावातील शासकीय इमारत, सभागृहात जागा उपलब्ध करून द्यावी. यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना श्री. परदेशी यांनी दिल्या.  तसेच महिला बचतगटांनी स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतमाल प्रक्रिया उभारणीसाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत  उद्योग उभारणीसाठी शेतकरी उत्पादक कंपनीला 60 टक्केपर्यंत अनुदान दिले जाते. तसेच प्रत्येक तालुक्याला लक्षांकापेक्षा अधिक उद्योग उभारणीस मंजुरी देता येते. त्यामुळे बँकांनी या प्रकल्पांतर्गत मंजूर उद्योगांना कर्ज पुरवठा करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेतकरी उत्पादक कंपनीला सहकार्य करणे आवश्यक असलायचे श्री. परदेशी यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्मार्ट अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बँकांकडे सादर केलेल्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक महिला सशक्तीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच राज्यात मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान सुरु करण्यात आले असून या अंतर्गत महिलांसाठी विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 1 टक्के निधी आणि प्रत्येक आमदारांच्या निधीतून 20 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यामाध्यमातून महिला बचतगटांसाठी विविध योजना राबविता येतील, असे राज्याचे महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेमार्फत हिरकणी मॉल सुरु करण्यात येणार आहे. तसेच बचतगटांच्या उत्पादनांना शीतगृह व इतर सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. लाडके यांनी ‘स्मार्ट’ प्रकल्प विषयी, तर उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक निवृत्ती भुत्ते, कुलदीप बोटवे यांनी महिला बचतगटांमार्फत स्थापित शेतकरी उत्पादक कंपनीबाबत माहिती दिली. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त यावेळी उपस्थितांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली.

महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी सदस्यांशी संवाद

            महिला बचतगट, तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांना ‘स्मार्ट’ अंतर्गत उद्योग उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार आणि ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी महिला बचतगट आणि शतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांशी संवाद साधला. यामध्ये उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचतगटाच्या महिलांनी सहभाग नोंदविला.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु