लातूर मध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न_ जगातले सर्वाधिक तरुण भारतात त्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग महत्वाचा

 

_लातूर मध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न_

जगातले सर्वाधिक तरुण भारतात त्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग महत्वाचा

                                                                                  - जिल्हाधिकारी  वर्षा  ठाकूर - घुगे

 

️ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, तांत्रिक अधिकारी यांचाही गौरव

️ मतदार दिनानिमित्त लातूर शहरात सकाळी युवकांच्या मतदार जागृती रॅली

 

लातूर दि.25(जिमाका)- जगातले सर्वाधिक तरुण भारतात आहेत. एका अर्थाने भारत हा तरुणांचा देश आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदान ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे, त्यात युवकांचा सहभाग असणे महत्वाचे आहे. त्यामुळे एकही युवक - युवती मतदार नोंदणी पासून वंचीत राहू नये असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केले.

  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी  नितीन  वाघमारे, उपविभागीय  अधिकारी  रोहिणी नऱ्हे- विरोळे, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त रामदास कोकरे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, तहसीलदार सौदागर तांदळे,  प्रा.डॉ. दिलीप नागरगोजे  यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

   आपण कुटुंबातले नाते कटाक्षाने सांभाळतांना त्यात कर्तव्य भावना असते. तशीच कर्तव्याची भावना लोकशाही राष्ट्रातील नागरिकांची मतदार नोंदणी, मतदान हे आहेत. याची जाणीव नव मतदार म्हणून पात्र झाले आहेत अशा युवक- युवती मध्ये यावी म्हणून निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. त्या प्रयत्नाचा भाग म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन असल्याची भावना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी बोलून दाखविली.

*जिल्ह्यातील महिला मतदानाचा टक्का वाढला *

लातूर जिल्ह्यातील महिला मतदानाचे प्रमाण हजार पुरुषांमागे 888 एवढे होते. ही गोष्ट जिल्ह्यासाठी भूषणावह नव्हती, हा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्याला काही प्रमाणात यश आले असून आता एक हजार पुरुषांमागे 898 महिला मतदार आहेत. हा टक्का वाढविण्यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत. महिला मतदार टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांचा निवडणूक आयोगाकडून विशेष गौरव केला असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

     यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बी. एल.ओ ) , तांत्रिक अधिकारी ( ऑपरेटर ), नायब तहसीलदार ( निवडणूक) , महसूल सहायक, तलाठी मंडळ अधिकारी, चुनाव पाठशाळा नोडल अधिकारी, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यातील विजेत्यांचा प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या विधी पळसापुरेचा गौरव

  नाशिक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात देशभरातील युवकांना राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यात महाराष्ट्रातून आपली लातूरची लेक विधी पळसापुरे हिला राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार लातूरकरांचाही सन्मान आहे. यामुळे युवकांच्या आयकॉन बनलेल्या विधी पळसापुरे यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी लातूरची कन्या लातूरची बोली महाराष्ट्रभर गाजवणारी युट्यूबर मेघा पवारचाही सत्कार करण्यात आला.

    लातूर जिल्ह्यातील मतदार नोंदणी करतांना महिला, युवक- युवती , दिव्यांग, तृतीय पंथी यांची नोंदणी वाढली पाहिजे यासाठी विशेष भर देण्यात आला. जे युवक मतदार म्हणून पात्र ठरू शकतात ते जिल्ह्यातील एकूण संख्येच्या तीन टक्के असून त्यातील 1.42 टक्के एवढ्या युवक- युवतीची नव मतदार म्हणून नोंदणी झाली असून बाकीच्या पात्र युवक - युवतीनी मतदार नोंदणी करावी यासाठी आमचा निरंतर प्रयत्न आहे अशी माहिती आपल्या प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप जगदाळे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट दयानंद महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या उत्तम संदेश देणाऱ्या मतदान जनजागृती पथनाट्याने झाली.

  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅली

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज जिल्हा क्रीडा संकूलातून भव्य अशी मतदार नोंदणी, मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यात विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

 


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु