विशेष लेख : ‘सारथी’मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण


 
राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील लक्षित गटातील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी ‘सारथी’ संस्थेमार्फत पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी सामान्य प्रवेश परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे दरवर्षी 250 उमेदवारांची करण्यात येते. या उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी या  तीन टप्याकरिता कोचिंगचे नियोजन करण्यात येते. 

 राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील उमेदवार या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. यासाठी त्यांच्याकडे सक्षम प्राधिकारी यांनी  निर्गमित केलेला जातीचा दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला  आवश्यक आहे. उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले नॉन-क्रिमीलेअर अथवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे. तसेच अर्जदाराने ‘सारथी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही उपक्रमांचा या अगोदर लाभ घेतलेला नसावा. इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी संस्थाकडून या प्रशिक्षणासाठी लाभ घेतलेला नसावा किंवा घेत नसावा.

 अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता धारण केलेली असावी. सिव्हील अँड वॉटर मॅनेजमेंट, सिव्हील अँड एन्व्हायर्नमेंटल, स्ट्रक्चरल, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरींग अथवा टेक्नॉलॉजी, सिव्हील आदी विषयातील बी.ई किनिवा बी. टेक. अथवा सिव्हील विषयातील डिप्लोमा आणि एएमआयई पदवी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराचे वय किमान 19 वर्ष ते कमाल 38 वर्ष असावे.

 आवश्यक कागदपत्रे

जातीचा दाखला किंवा शाळेचा दाखल अथवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, नॉन क्रिमी-लेअर प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र, दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि राष्ट्रीयकृत बकेचे पासबुक, चार पासपोर्ट आकाराचे फोटो

 प्रशिक्षणाचा कालावधी आणि टप्पे

पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षेसाठी अंदाजे तीन महिने किंवा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेचा घोषित दिनांक यापैकी जे अगोदर असेल त्या कालावधीपर्यंत प्रशिक्षण दिले जाते. दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षेसाठी 5 महिने किंवा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे घोषित दिनांक यापैकी जे अगोदर असेल त्या कालावधीपर्यंत प्रशिक्षण दिले जाईल. तिसऱ्या टप्प्यात मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणीसाठी अंदाजे दोन महिने किंवा मुलाखत अथवा व्यक्तिमत्व चाचणीच्या घोषित दिनांकापर्यंत प्रशिक्षण दिले जाते.

 अशी आहे लाभार्थी निवड पक्रिया

विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक, मार्गदर्शक सूचना, हमीपत्र व जाहिरात ‘सारथी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. याबाबतची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. अर्जदाराची निवड ‘सारथी’मार्फत आयोजित कॉमन इंट्रान्स टेस्ट (सीईटी) मध्ये प्राप्त गुणांवर आधारित केली जाते. सीईटी मधील गुणांकानुसार गुणवत्ता यादी ‘सारथी’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. निकाल जाहीर झाल्यानंतर किमान 10 दिवसाच्या आत विद्यार्थ्यांची पुणे येथील ‘सारथी’ कार्यालयात कागदपत्रे पडताळणी करण्यात येते. या पडताळणीसाठी उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर राहिल्यास तो प्रवेशास पात्र राहत नाही. कागदपत्रे पडताळणी द्वारे पात्र विद्यार्थ्यांची 10 दिवसाच्या आत प्रवेश प्रकिया पूर्ण करण्यात येते. 

  लाभाचे स्वरूप

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश घेतलेल्या लाभार्थ्याचे कोचिंग शुल्क ‘सारथी’मार्फत कोचिंग संस्थांना अदा केले जाते. लक्षित गटातील पात्र उमेदवारास पुणे येथील कोचिंग कालावधीतील कोचिंग वर्गातील किमान 75 टक्के मासिक हजेरीच्या व किमान 35 टक्के टेस्ट स्कोरच्या आधारे 8,000 रुपये विद्यावेतन प्रति माह प्रशिक्षण कालावधीमध्ये अदा करण्यात येते. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेचा प्रशिक्षण कालावधीत कोचिंग वर्गातील किमान 75 टक्के मासिक हजेरीच्या व किमान 35 टक्के टेस्ट स्कोरच्या आधारे 8,000 रुपये विद्यावेतन प्रतिमाह प्रशिक्षण कालावधीमध्ये अदा करण्यात येते. ‘सारथी’ संस्थेच्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

 

-         तानाजी घोलप, माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु