खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण पूर्ण

 



खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सर्वांनी काळजीपूर्वक पार पडावी

-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·        23 जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला होणार सुरुवात

लातूर, दि. 21 (जिमाका):  राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आणि बिगर मराठा खुल्या प्रवर्गाचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 23 जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून या अनुषंगाने सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्वांनी काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात झालेल्या सर्वेक्षण विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षणात त्या बोलत होत्या.

सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संगीता टकले, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, शोभा जाधव, अविनाश कोरडे यांच्यासह सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी, लातूर शहर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात सर्वेक्षणाची कार्यवाही अचूक, परिपूर्ण आणि पारदर्शक होण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी प्रगणक, पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. घरोघरी जावून माहितीचे संकलन करण्याची जबाबदारी प्रगणकांवर आहे. सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी. यामध्ये कोणतीही कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

‘मास्टर ट्रेनर्स’ यांचे प्रशिक्षण पूर्ण

सर्वेक्षणाची कार्यवाही मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे होणार असून याविषयी माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी गोखले इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक संजय कांबळे, सुरज सुरवसे आणि श्री. सारंग यांनी सर्वांना मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे करावयाच्या सर्वेक्षणाची पीपीटीद्वारे माहिती दिली, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणात सर्व तालुका पातळीवर मास्टर ट्रेनर्स यांच्यामार्फत सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना सर्वेक्षणाबाबत माहिती दिली जाणार आहे.

सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

मराठा आणि बिगर मराठा खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरु होत आहे. यासाठी प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी हे घरोघरी जावून सर्वेक्षणाची कार्यवाही करणार आहेत. त्यामुळे असे प्रगणक सर्वेक्षणासाठी घरी आल्यानंतर त्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे. सर्वेक्षणासाठी येणारे प्रगणक हे मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे सर्वेक्षणासाठी आवश्यक माहिती नोंदविणार आहेत.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु