दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी मिळणार 5 रुपये अनुदान

 

दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी मिळणार 5 रुपये अनुदान

·       शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

लातूर, दि. 25 (जिमाका): राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ-उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ, खाजगी प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय 5 जानेवारी, 2024 रोजी निर्गमीत झाला आहे. त्यानुसार 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ही अनुदान योजना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे.

सहकारी दूध उत्पादक संघ व खाजगी प्रकल्प यांनी 3.5 फॅट तथा 8.5 एस.एन.एफ. या गुणप्रतीच्या दुधासाठी प्रति लिटर 27 रुपये दर देणे आवश्यक आहे, कमीत कमी 3.2 फॅट तथा 8.3 एस.एन.एफ. पर्यतच्या दुधासाठी अनुदान योजना लागु आहे. 3.5 तथा 8.5 या गुणप्रतिपेक्षा कमी अथवा जास्त होणाऱ्या फॅट व एस.एन.एफ. साठी प्रत्येकी 30 पैसे वाढ अथवा वजावट करणे आवश्यक आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून अनुदान पात्र गाय दुधासाठीचे प्रति लिटर 5 रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर  डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहेत. यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते, आधारकार्ड व इअर टॅगशी जोडलेले असणे तसेच त्याची आयएनएपीएच तथा भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील सहकारी दूध उत्पादक संघ व खाजगी प्रकल्प, शितकरण केंद्रे आणि फॉर्मर प्रोड्युसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे प्राप्त अर्जांची तपासणी करुन लातूर जिल्ह्यातील 1 सहकारी संघ, 3 खाजगी दूध प्रकल्प पात्र ठरविण्यात आले आहेत.

शासनाच्या 5 रुपये अनुदान योजनेपासून छत्रपती संभाजीनगर विभागातील सहकारी संघ व खाजगी दुग्ध प्रकल्पांना दूध पुरवठा करणारे एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये. यासाठी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाशी संपर्क साधावा. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत छत्रपती संभाजीनगर विभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाय, म्हैस यांचे इअर टॅगींग करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.  त्यासाठी सर्व दूध उत्पादक शेतकरी यांनी आपापल्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तसेच सहकारी संघ व खाजगी दुग्ध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांनी प्रकल्पांना आवश्यक माहिती देवून आपल्या जनावरांचे टॅगींग करुन घेवून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु