राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विशेष मतदार नोंदणी मोहीम

 

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विशेष मतदार नोंदणी मोहीम

लातूर, दि. 24 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी रोजी 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर, मतदारसंघनिहाय व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर मतदारसंघामधील नामांकित 16 महाविद्यालयांमध्ये 18 ते 19 वयोगटातील युवकांची मतदार नोंदणी करण्यासाठी 24 व 25 जानेवारी रोजी विशेष मतदार नोंदणी शिबीर राबविण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी कळविले आहे.

  लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. मतदार नोंदीमध्ये युवा वर्गाची मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून लातूर शहर मतदारसंघामध्ये यापूर्वी अनेकवेळा मतदार नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

14 व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून लातूर शहरातील दयानंद (सर्व शाखा) महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय, श्रीमती  सुशिला देवी महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, कॉकसीट महाविद्यालय, एम.आय.टी. महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय एम.एस. बिडवे महाविद्यालय आदी महाविद्यालयांमध्ये 18 ते 19 वयोगटातील युवा विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी 24 व 25 जानेवारी रोजी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीरामध्ये 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांनी फॉर्म 6 भरुन मतदार नोंदणी करावयाची आहे. या शिबिराचा महाविद्यालयातील व महाविद्यालयाबाहेरील सर्व 18 ते 19 वयोगटातील मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा लातूर शहर मतदारसंघ-235 चे मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु