योजना 'सारथी'च्या...

*डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती;

दरवर्षी 300 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ‘सारथी’चे सहाय्य*


राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. 'शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमालेचा हा पाचवा भाग...

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील लक्षित गटातील विद्यार्थ्यांना देशामध्ये उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी, यासाठी ‘सारथी’मार्फत डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क देण्यात येते. 

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या जातीतील असावा. तसेच त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदार विद्यार्थ्यांने राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या अथवा केंद्र शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. या शिष्यवृत्तीसाठी विहीत केलेल्या देशातील 200 नामांकित विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पुर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असणे आवश्यक आहे. या 200 नामांकित विद्यापीठ आणि संस्थांची यादी 'सारथी'च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 25 वर्षे व पदव्युत्तर पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे. दरवर्षी 300 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. यामध्ये 50 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत.

 

*पात्र विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप*

विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क तसेच, भोजन शुल्काची सत्रनिहाय रक्कम विद्याथ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. तसेच जे विद्यार्थी वसतिगृहात न राहता अन्यत्र राहात असतील, अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क व भोजन शुल्काची रक्कम ही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणी करण्यात येत असलेल्या रक्कमेच्या मर्यादेत सत्रनिहाय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा केली जाते. तसेच अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसाठी 25 हजार रुपये, शैक्षणिक साहित्य आणि इतर खर्चासाठी 25 हजार रुपये अशी एकूण 50 हजार रुपये रक्कम प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दोन टप्प्यात जमा केली जाते. 

या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेत येत नाही. तसेच, विद्यार्थ्याला संबंधित संस्थेत मिळणारे विद्यावेतन, फेलोशिप अन्य कोणतेही लाभ अभ्यासक्रम कालावधीत मिळत असल्यास ते वजा करुन उर्वरित शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यापीठ, संस्थांमध्ये प्रवेशित अभ्याक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेला अभ्यासक्रम विहीत कालावधीत पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक आहे.

*गुणानुक्रमे होते विद्यार्थ्यांची निवड*

या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून इयत्ता दहावी, बारावीची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावी  परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांचे डिप्लोमाच्या परिक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीकरीता पदवी अभ्यासक्रमातील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. तसेच, सीजीपीए व जीपीएच्या बाबतीत संबंधित विद्यापीठाचे टक्केवारी रुपांतरण प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. ' सारथी'च्या https://sarthi-maharashtragov.in/  या संकेतस्थळावर योजनेच्या अटी, शर्ती आणि पात्रता निकषांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

- *तानाजी घोलप,* माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु