नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान · १३ फेब्रुवारीला विशेष वेबिनारचे आयोजन
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत
हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान
· १३ फेब्रुवारीला विशेष वेबिनारचे आयोजन
लातूर, दि. १२ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करून शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा, या उद्देशाने “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान” राबविण्यात येत आहे. या अंतर्गत १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत “लागवड तंत्र, हमखास यशाचा मंत्र” या विषयावर दूरदृश्य पद्धतीने (युट्युब लिंकद्वारे) विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हे वेबिनार http://youtube.com/c/PoCRAMaharashtra या युट्युब चॅनेलवर थेट पाहता येईल.
खरीप हंगामातील तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अवलंब मे-जून महिन्यात होत असला तरी, त्याची पूर्वतयारी फेब्रुवारीपासूनच सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होतो, त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि बेड मेकर, पेरणी यंत्रे, जैविक निविष्ठा तसेच इतर आवश्यक साधनांची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित होते.
या अभियानाचा भाग म्हणून प्रकल्पामार्फत फेब्रुवारी महिन्यापासून तंत्रज्ञानाविषयी ऑनलाईन वेबिनार आणि डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकता वाढवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment