ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर
ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर
लातूर, दि. १० : ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
केल्याबद्दल लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना ऊर्जा
मंत्रालयाचा ‘ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२४-२५’ जाहीर झाला आहे. जिल्ह्यात
वीज बचतीबाबत जनजागृती करणे, शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर
वाढवणे आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यात पालकमंत्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे
यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेऊन
ऊर्जा मंत्रालयाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. या सन्मानामुळे लातूर
जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने ऊर्जा बचतीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली
असून, शाश्वत ऊर्जा वापर, सौर ऊर्जेचा अवलंब आणि कार्यक्षम व्यवस्थापन
यावर भर दिला. या कामगिरीसाठी कार्यालयाला ऊर्जा संवर्धन पुरस्कार जाहीर
करण्यात आला आहे. हे प्रशासकीय पातळीवर हरित ऊर्जेचे अनुकरणीय उदाहरण
ठरले आहे. एनर्जी ऑडिट २०२२-२३ मध्ये दिलेल्या सर्व सूचनांची
जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी करण्यात आली. कार्यक्षम उपकरणांचा
वापर, १०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, पारंपरिक व अपारंपरिक
ऊर्जा साधनांचा समन्वयित, यथोचित आणि काळजीपूर्वक वापर यामुळे दरवर्षी ५५
हजार युनिट्स वीज बचत होत आहे. याशिवाय जिल्ह्यातील शालेय
विद्यार्थ्यांना ऊर्जा बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘ऊर्जादूत’
संकल्पना राबवण्यात आली.
राज्यात उद्योग, अभियांत्रिकी, रसायने, औषधे व अन्न प्रक्रिया, मेटल व
स्टील, कागद निर्मिती, तेल व रसायने, वस्त्रोद्योग, थर्मल पॉवर, बांधकाम
व्यवसाय, स्थापत्य, शासकीय इमारती आणि सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये ऊर्जा
संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था व व्यक्तींना गेल्या १८
वर्षांपासून महाऊर्जा (ऊर्जा मंत्रालय) द्वारे ऊर्जा संवर्धन पुरस्कार
देण्यात येत आहेत. त्यानुसार ‘ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन
उत्कृष्टता-१८’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले
असून, यामध्ये लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना ‘ऊर्जा
संवर्धन पुरस्कार २०२४-२५’ जाहीर झाला आहे.राज्य पुरस्कारासाठी निवड
झाल्याबद्दल महाऊर्जा पुणे येथील महाव्यवस्थापक समीर घोडके, लातूर
विभागीय महाव्यवस्थापक आनंद कुलकर्णी, ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर आदींनी
अभिनंदन व्यक्त केले आहे.
गेल्या तीन वर्षात जिल्ह्याला मिळालेले महत्वाचे पुरस्कार
लातूर जिल्ह्याला गेल्या सुमारे तीन वर्षांत मिळालेला हा आठवा राष्ट्रीय
तथा राज्य स्तरावरील पुरस्कार ठरला आहे. यामध्ये राज्य शासनाच्या १५०
दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल
पुरस्कार, लोकसत्ता आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड
इकॉनॉमिक्सकडून सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचा जिल्हा निर्देशांक
पुरस्कार, सशस्त्र सेना ध्वज निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामिगीरीबद्दल
राज्यस्तरीय पुरस्कार, दिव्यांग मुलांसाठी राबविलेल्या उपक्रमाबाबत स्कॉच
अवार्ड, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल
उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील
कामगिरीबद्दल ‘निर्यात पुरस्कार २०२५’, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रम अंतर्गत सलग दोन वर्षे पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मितीमध्येही लातूर जिल्हा अग्रेसर
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत लातूर जिल्ह्यात ६५
प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्याद्वारे ३२३ मेगावॅट क्षमतेची वीज
निर्मिती होत आहे. तसेच, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत
घराच्या छतावर सौर पॅनेल लावून वीज निर्मिती करून वीजबिल शून्य
करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्ह्यातील ११ हजार १२३ लाभार्थ्यांनी
घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले असून, त्याद्वारे ४३.२३ मेगावॅट वीज
निर्मिती होत आहे. यामुळे जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जेच्या (नवीकरणीय
ऊर्जेच्या) वापराला मोठी चालना मिळाली आहे. वीज निर्मितीमध्ये अग्रेसर
असलेल्या लातूर जिल्ह्याला आता ऊर्जा संवर्धनासाठी पुरस्कार जाहीर झाला
आहे.
***
Comments
Post a Comment