भूकंपामुळे इमारत कोसळली; जखमींना तातडीने मदत मिळाली !

भूकंपामुळे इमारत कोसळली; जखमींना तातडीने मदत मिळाली ! * आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालमीत शोध व बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक * पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल * राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने आठ जणांचा जीव वाचविला लातूर, दि. १७ (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुल परिसरात आज सकाळी साडेअकरा वाजता मोठा आवाज झाला. भूकंपाच्या धक्क्याने येथील इमारत कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक अग्निशमन पथक, आपदा मित्रांचे शोध व बचाव पथक तसेच रुग्णवाहिका आणि आरोग्य पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. हा प्रसंग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूकंप विषयक आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालमीचा होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे, औसा-रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ, पुणे येथील एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट गौरव जांकटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. भूकंपामुळे दुमजली इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण लातूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला आणि आरोग्य विभागालाही तात्काळ सूचित करण्यात आले. पोलीस पथक, अग्निशमन वाहन, होमगार्ड, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक, आपदा मित्र हे काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. ‘इन्सीडंट रेस्पॉन्स सिस्टम’ (आयआरएस) नुसार इन्सीडंट कमांडर, ऑपरेशनल चीफ, लायझन ऑफिसर, इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्रभारी, जनसंपर्क अधिकारी यांनी त्वरित जबाबदाऱ्या पार पाडल्या. घटनास्थळी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आणि इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित झाले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. पोलीस, आपदा मित्र आणि अग्निशमन दलाने जखमींचा शोध घेऊन त्यांना वैद्यकीय पथकाकडे पाठवण्यास सुरुवात केली. इमारतीत लागलेली आग अग्निशमन पथकाने नियंत्रणात आणली. इमारतीखाली काही जण अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन इन्सीडंट कमांडरांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी (एनडीआरएफ) संपर्क साधला आणि शोध व बचाव पथक मागवले. एनडीआरएफ पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक पथकांनी चार जखमींना उपचारासाठी रवाना केले. अजयकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील एनडीआरएफ पथकाने घटनास्थळी पोहोचून इन्सीडंट कमांडर घनश्याम अडसूळ यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली. इमारतीत आणखी आठ जण अडकले असल्याचे समजताच त्यांनी शोध कार्य सुरू केले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांची सुटका करून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले. इतर व्यक्तीचा ठावठिकाणा समजत नसल्याने एनडीआरएफच्या प्रशिक्षित श्वान पथकाची मदत घेण्यात आली. श्वानाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचे ठिकाण शोधून दिले. विविध साधनांचा वापर करून बेशुद्धावस्थेतील गंभीर जखमीला बाहेर काढण्यात आले आणि त्यालाही रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवले. भूकंपग्रस्त इमारतीच्या लगत असलेल्या एका बसमध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळताच ऑपरेशनल चीफने एनडीआरएफ पथकाला सूचना दिल्या. कटिंग टीम आणि व्हीएलएस उपकरणांच्या सहाय्याने त्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. श्वान पथकाच्या मदतीने तपासणी करून इमारतीत आणखी कोणी अडकले नसल्याची खात्री पटल्यानंतर इन्सीडंट कमांडरांनी शोध व बचाव मोहीम थांबवल्याची घोषणा केली. भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधणे, त्यांची क्षमता वाढवणे यासाठी ही रंगीत तालिम आयोजित करण्यात आली होती. सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली आणि जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. याप्रसंगी तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी इन्सीडंट कमांडर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांनी डेप्युटी इन्सिडेंट कमांडर म्हणून जबाबदारी पार पाडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्राचे डॉ. प्रमोद पाटील, एम. ए. खान, महानगर गॅसचे सेफ्टी ऑफिसर अक्षय कुचेकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. लायजनिंग ऑफिसर म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे, कमांड पोस्ट प्रमुख म्हणून नंदकिशोर करले, कम्युनिकेशन पोस्ट प्रमुख म्हणून श्रीमती शीतल शिंदे व श्रीराम वाघमारे, स्थानिक ऑपरेशन प्रमुख म्हणून अग्निशमन अधिकारी बापू किरण देशमुख, उदगीरचे अग्निशमन अधिकारी श्री. क्षीरसागर, अहमदपूरचे अग्निशमन अधिकारी कैलास सोनकांबळे, मेडिकल पोस्ट प्रमुख म्हणून डॉ. विशाल गरड, तसेच लॉ अँड ऑर्डर प्रमुख म्हणून पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातील श्रीराम वाघमारे, इनायत पटेल, सय्यद गफार आणि श्रीमती आफ्रोज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस दल, लातूर महानगरपालिका अग्निशमन दल, आरोग्य विभाग, डायल १०८ रुग्णवाहिका, विविध महाविद्यालयांतील एनसीसी विद्यार्थी आणि आपदा मित्र यांनी या तालमीत सहभाग नोंदविला. जिल्हा क्रीडा संकुलात अत्याधुनिक शोध व बचाव साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक बचाव पथकांसाठी लवकरच प्रशिक्षणाचे आयोजन : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीत स्थानिक शोध व बचाव पथकांनी उत्तम कामगिरी केली होती. भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी स्थानिक पथकांना एनडीआरएफच्या सहकार्याने लवकरच प्रशिक्षण आयोजित केले जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच या रंगीत तालमीत सर्व विभागांनी चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विविध पथके आणि साहित्य दालनांना भेट देऊन पाहणी केली. ***

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित