जिल्हा युवा पुरस्कार २०२४-२५ साठी अर्ज करण्यास २५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

जिल्हा युवा पुरस्कार २०२४-२५ साठी अर्ज करण्यास २५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ लातूर, दि. १२ : राज्याचे युवा धोरण २०१२ अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय जिल्हा युवा पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. या पुरस्काराद्वारे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक-युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला जातो आणि युवा विकासाच्या क्षेत्रात अधिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत २०२४-२५ च्या पुरस्कारासाठी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम १० हजार रुपये असे आहे, तर नोंदणीकृत संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम ५० हजार रुपये इतके आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र युवक, युवती आणि संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, अपेक्षित प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार अर्ज सादर करण्याची संधी पुन्हा देण्यात येत आहे. जिल्हा युवा पुरस्कार २०२४-२५ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे. इच्छुक युवक-युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर येथून अर्ज प्राप्त करून घ्यावेत. अर्जासंबंधित अधिक माहितीसाठी बाबासाहेब इंगोले, क्रीडाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत