सन २०२६-२७ साठी जिल्हा वार्षिक योजनेचा ५११ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर ! विहित कालावधीत निधी खर्चासाठी नियोजनबद्ध काम करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
सुधारित वृत्त :-
सन २०२६-२७ साठी जिल्हा वार्षिक योजनेचा ५११ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर !
विहित कालावधीत निधी खर्चासाठी नियोजनबद्ध काम करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
• सन २०२५-२६ मधील पुनर्विनियोजन, जानेवारी अखेरच्या खर्चास मंजुरी
• प्रत्येक काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना
लातूर, दि. ११ : जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही स्थितीत निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासोबतच प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होईल, याची काळजी घ्यावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
आमदार विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित कामे विहित कालावधीत पूर्ण होणे गरजेचे आहे. या कामांमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड किंवा हयगय होणार नाही, याची दक्षता संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी घ्यावी, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. तसेच कंत्राटदारांकडून मुदतीत कामे पूर्ण केली जात नसल्यास त्यांच्यावर संबंधित विभागाने कठोर कार्यवाही करावी. एखादा कंत्राटदार मुदत संपूनही काम पूर्ण अथवा सुरु करत नसेल तर असे काम विहित मार्गाने इतर कंत्राटदाराला देवून लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. विनाकारण विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना पुन्हा जिल्ह्यात नवीन काम देवू नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
लातूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्व. विलासराव देशमुख मार्ग आणि बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती द्यावी. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाच्या धर्तीवर लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्ते, उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करावा. या आराखड्याचे संबंधित लोकप्रतिनिधींसमोर सादरीकरण करून त्यांच्याही सूचना घ्याव्यात, असे पालकमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामासाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव, तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचा प्रस्ताव महानगरपालिकेने तातडीने शासनाला सादर करावा. यासाठी राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बाह्यवळण रस्त्याच्या ८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही गतीने करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
रस्ते, सिंचन प्रकल्प दुरुस्तीसाठी निधी द्यावा : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
अहमदपूर, चाकूर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तीर्थवाडी ते चाकूर रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात यावे, या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल. तालुक्यातील विविध ठिकाणी वीज उपकेंद्रांची कामे मंजूर आहेत. मात्र, अनेक कामे अद्यापही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा होत नसल्याची बाब सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी मांडली. अतिवृष्टी काळात अहमदपूर, चाकूर तालुक्यातील सिंचन तलावांचे सांडवे फुटले आहेत. या सांडव्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आवश्यक सुविधांसाठीही निधी उपलब्ध करून द्यावा, असे सहकार मंत्री म्हणाले.
ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे. काही रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तसेच अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर सौरकृषी पंप द्यावेत, असे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी सांगितले. तसेच लातूर शहरात भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्याची सूचना त्यांनी केली.
अतिवृष्टीमुळे रस्ते, विद्युत रोहीत्रांचे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे. याबाबतची मागणी राज्यस्तरीय बैठकीत करावी. तसेच सध्या इयत्ता बारावी, इयत्ता दहावी परीक्षा काळात वीज पुरवठा खंडित होवू नये, याची दक्षता घ्यावी, असे आमदार विक्रम काळे यावेळी म्हणाले.
लातूर शहराच्या बाह्य वळण रस्त्याचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. त्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करावी. लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला गती द्यावी. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही लवकर व्हावी, असे आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक उभारण्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार महानगरपालिकेने जागा निश्चित करून याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवावा. ग्रामीण भागात जल जीवन मिशनची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांवर जिल्हा परिषदेने कठोर कार्यवाही करावी, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह उभारणी, शाळांमध्ये सौर ऊर्जा वापरावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
उदगीर, जळकोट तालुक्यातील निजामकालीन शाळांच्या इमारतींची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. यासोबतच उदगीर येथे उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहार परिसरात विद्युत रोषणाई करण्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले. तसेच उदगीर तालुक्यात अल्पसंख्याक विभागामार्फत मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीच्या अंतर्गत फर्निचर कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास हे वसतिगृह सुरु करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
औसा मतदारसंघामध्ये ११ विद्युत उपकेंद्रांची कामे मुदत संपूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून ही कामे काढून घेऊन निकषात बसणाऱ्या दुसऱ्या एजेन्सीकडून पूर्ण करून घ्यावीत अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. लातूर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच गंजगोलाई परिसरात अतिक्रमणमुक्तीसाठी महानगरपालिकेने तत्काळ आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध नाही, तिथे जमिनीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच जमीन उपलब्ध असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमी शेड उभारणीसाठी निधी देवून पूर्ण जिल्ह्यातील स्मशानभूमीचा विषय मार्गी लावावा, असे आमदार रमेश कराड म्हणाले. जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता गृहांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठीही ठोस उपाययोजना हाती घ्यावात. अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी सन २०२५-२६ मध्ये ३१ जानेवारी २०२६ अखेर जिल्हा वार्षिक योजनेतून झालेल्या खर्चाची व सन २०२६-२७ मध्ये प्रस्तावित कामांची माहिती दिली.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
विमानतळ, रेल्वे स्थानक विकासासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष सुरु करण्याची मागणी करणार
जिल्हा नियोजन समितीमध्ये लेखाशीर्ष नसल्याने जिल्ह्यातील विमानतळ, रेल्वे स्थानकांमधील विकास कामांसाठी जिल्हास्तरावर निधीची तरतूद करता येत नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमध्ये या बाबींसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष सुरु करण्याची विनंती करणार असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी म्हणाले. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी काही प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देता येईल. तसेच विमानतळ विकासाला मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
ऊर्जा संवर्धन पुरस्कार, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा समावेश करण्यात आला. तसेच ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना ऊर्जा मंत्रालयाचा ‘ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२४-२५’ जाहीर झाला आहे. यानिमित्त जिल्हा नियोजन समिती बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांचे अभिनंदन करण्यात आले.
पुढील वर्षासाठी ५११ कोटी ५४ लाख रुपयांचा आराखडा; वाढीव निधीसाठी प्रयत्न
लातूर जिल्ह्यासाठी सन २०२६-२७ करिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ३८३ कोटी ३१ लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) अंतर्गत १२५ कोटी रुपये आणि जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना) अंतर्गत ३ कोटी २३ लाख रुपये अशा एकूण ५११ कोटी ५४ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये जिल्हा विकास आराखड्यासाठी २५ टक्के निधी प्रस्तावित केला असून याअंतर्गत जिल्ह्यात कृषी व संलग्न सेवा, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील विविध कामांवर भर देण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते, अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसह जिल्ह्यास आवश्यक ग्रामविकास, वने, पशुसंवर्धन, ऊर्जा विकास, वैद्यकिय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य, लघु पाटबंधारे, सामान्य शिक्षण, नगर विकास पर्यटन, यात्रास्थळ आदी क्षेत्रांच्या विकासासाठी शासन स्तरावर २१६ कोटी ६९ लाख रुपयांची वाढीव मागणी राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
***




Comments
Post a Comment